मुंबई /-

कोविड-19 विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे. यासाठी येत्या 15 तारखेपासून सुरू होणाऱ्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम मुंबई महानगरपालिकेमार्फत येत्या 15 तारखेपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीबाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, आमदार सुनील प्रभू, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ही मोहीम नागरिकांसाठी असल्याने यामध्ये त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. यासाठी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांना कल्पना देऊन जागृती करण्यात यावी. नवीन पिढी ही अतिशय जागरूक असल्याने यामध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेताना त्यांच्याकडून घोषवाक्ये लिहून घ्यावीत. यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून जनजागृतीसाठी यामधील चांगल्या घोषवाक्यांचा वापर करता येईल. महानगरपालिका क्षेत्रातील होर्डिंग्ज, बस, रेल्वे, विविध माध्यमे यांचा वापर करून मोहिमेचे उद्दिष्ट नागरिकांपर्यंत पोहोचवावे. याच पद्धतीने राज्यभर उपाययोजनांसाठी नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
व्यक्ती तसेच कुटुंब हा केंद्रबिंदू मानून कोविड नियंत्रणासाठी वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत नागरिकांनी आपापसात अंतर राखणे, फेसमास्क चा वापर करणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्री चा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या शिवाय जीवनशैलीचा भाग म्हणून वैयक्तिक, कौटुंबिक, वसाहती, दुकाने, कार्यालये आणि प्रवासाची साधने अशा सहा मुख्य स्तरावर वावरतानाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या सर्व बाबी आता जीवनशैलीचा भाग म्हणून अंगिकारणे अतिशय गरजेचे आहे. कोविड विषाणूवर प्रभावी लस सापडत नाही तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करून या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी केले.मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबतचे सादरीकरण आयुक्त इकबाल चहल यांनी केले. तर प्रधान सचिव डॉ.व्यास यांनी राज्यातील उपाययोजनांबाबतची माहिती यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page