हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे केली मागणी….
मालवण /
२५ डिसेंबर व ३१ डिसेंबर या दिवशी गडकोट, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धुम्रपान पार्ट्या करणे व फटाके फोडणे याला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पोलिस प्रशासन तसेच तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना देण्यात आले आहे.
नववर्ष स्वागताच्या नावाखाली ‘३१’ डिसेंबरच्या मध्यरात्री होणारे समाज व संस्कृती विघातक गैरप्रकार रोखणे व विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे याबाबत स. का. पाटील महाविद्यालय, टोपीवाला हायस्कूल व भंडारी हायस्कूल यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी समितीचे कार्यकर्ते मधुसूदन सारंग, शिवाजी देसाई, अनिकेत फाटक, अशोक ओटवणेकर, स्वराज्य सेवते सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शिल्पा खोत, यतिन खोत उपस्थित होते.
यावर्षी कोरोना महामारी व भारताची वैभवशाली परंपरा व सत्वप्रधान संस्कृती यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला असताना अशा प्रकारच्या ‘चिल्लर पार्ट्या’, ‘ रेव्ह पार्ट्या’ व त्यानिमित्त होणारे अंमली पदार्थांचे सेवन व त्यामुळे वाढत जाणारी व्यसनाधीनता या गैरप्रकारामुळे निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्था यांच्या दृष्टीने निर्माण होणारी गंभीर परिस्थिती तसेच पोलिस व प्रशासन यावर येणारा अतिरिक्त ताण याचा विचार करता असे प्रकार रोखणे आवश्यक असून यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.