तुळस येथे स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य मार्गदर्शन..

तुळस येथे स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य मार्गदर्शन..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य मार्गदर्शन करण्यात आले. कुडाळ तालुक्यातील गणेश सावंत सावंत व निलेश राणे या दोन मित्रांनी एकत्र येत एक अनोखा उपक्रम जिल्ह्यात सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत हे दोन युवक गावोगावी जाऊन स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग विनामूल्य घेत आहेत.या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच तुळस गावी करण्यात आला. आकार फाउंडेशन आणि श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल तुळस यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात त्यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन वर्गास ४५ विद्यार्थी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थी आहेत, पण त्यांना संधी मिळत नाही, तसेच स्पर्धा परीक्षेकडे कोणी संधी म्हणूनही बघत नाही. म्हणूनच गणेश व निलेश हे दोघे मित्र एकत्र येऊन जास्तीत जास्त मुलांना स्पर्धा परीक्षेकडे वळविण्यासाठी प्रयत्न प्रयत्न करत आहेत. गणेश सावंत हे रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर निलेश राणे भारतीय पोस्ट खात्यात कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षेचा आपला अनुभव सांगताना गणेश सावंत म्हणाले की,२५ परीक्षा दिल्यानंतर २६ व्या परीक्षेत आपल्याला यश मिळाले २६ परीक्षांचा हा प्रवास अत्यंत खडतर होता. त्यात माझ्या आयुष्यातील सात-आठ वर्षे वाया गेली. वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाले असते, तर कदाचित खूप लवकर शासकीय सेवेत येण्याची संधी मिळाली असती. आम्हाला आलेल्या अनुभवाचा नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा. यासाठी आम्ही एकत्र येऊन हा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. निलेश राणे म्हणाले, आम्ही एकत्र येऊन सावंतवाडी मधील विठ्ठल मंदिरात अभ्यास करायचो, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षा देण्यास आम्ही सुरुवात केली. मात्र अथक प्रयत्नाने आपल्याला यश मिळेल याची पूर्ण खात्री होती, त्याप्रमाणे आम्हाला यश सुद्धा मिळाले आहे. आमच्यामुळे जर नवीन स्पर्धा परीक्षावीर तयार होत असतील, तर त्यांच्या यशात खारीचा वाटा घ्यायला आम्हाला सुद्धा आवडेल, या हेतूने आम्ही जिल्ह्यात विनामूल्य मार्गदर्शन घेण्याचे ठरविले आहे, असे सांगितले.स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क साधावा,असे आवाहन गणेश व निलेश यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..