वेंगुर्ला /-
आज मोदी सरकारच्या कालावधीत पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांच्या किमती रोजच्या रोज वाढत आहेत.गरीब – सर्वसामान्यच नव्हेत तर मध्यमवर्गीय जनतेचे बजेट कोलमडून गेले आहे.भाजपा सरकारने एकही निर्णय जनतेच्या हिताचा निर्णय घेतला नाही.त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या सरकारच्या विरोधात “जनता संपर्क अभियान” प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांनी वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेत दिली.
देशामध्ये पेट्रोल – डिझेल – एलपीजी गॅस चे भाव गगनाला भिडलेले आहेत.तसेच भाजीपाला कडधान्य यांचेही दर ३० ते ४० टक्के जादा वाढले आहेत.या संदर्भात केंद्रशासनाच्या विरोधात विविध मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले कॅम्प महिला काथ्या कामगार सहकारी संस्था येथे पत्रकार परिषद संपन्न झाली.यावेळी प्रज्ञा परब,नितीन कुबल,सत्यवान साटेलकर,रोहन वराडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी एम.के.गावडे यांनी आज मोदी सरकारच्या कालावधीत सुरू असलेली भाववाढ, व त्यामुळे जनतेचे बिघडलेले बजेट,जीडीपी,जी एसटी, नोटाबंदी यावर भाष्य केले.
यावेळी गावडे पुढे बोलताना म्हणाले की,आज पेट्रोल,डिझेल, सिलेंडर गॅस,कडधान्य व अन्य यांचे वाढते दर पाहता सामान्य माणसाने जगायचे कसे ? पेट्रोल ने शंभरी गाठली आहे,तर डिझेल दरवाढीमुळे ट्रान्स्पोर्ट चार्ज वाढले आहेत,त्याचा थेट परिणाम मध्यमवर्गीयांवर झाला आहे.सामान्य जनतेची फरफट पाहिल्यावर हेच काय ते “अच्छे दिन”असा प्रश्न पडतो.यावर मोदी यांनी बोलण्याची आवश्यकता आहे.२०१९ मध्ये मिळालेल्या बहुमताचा उपयोग जनतेच्या हितासाठी करणे आवश्यक होते.परंतु भाजपा सरकारने असे काही न करता कृषी कायदे बदलणे,नोटाबंदी,जीएसटी यासारखे गोंधळाचे निर्णय घेतले गेले.इंदिरा गांधी यांनी गरिबी हटविण्याचे काम केले होते ,परंतु आता विकास उलट्या दिशेने होत आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाववाढ,जीएसटी व विविध स्तरावर केंद्र सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने जनजागृती करण्याचे काम करणार आहे.यामध्ये जनता संपर्क अभियान सुरू करण्यात येणार असून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस,महिला विंग,पक्षाचे सर्व सेल आदी सर्वांना समाविष्ट करून घेतले जाणार आहे,अशी माहिती यावेळी एम.के.गावडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page