उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही शेत जमिनीबाबत प्रशासनाची उदासीनता का ?
वैभववाडी /-
नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथील प्रकल्पग्रस्तांचेआपल्या प्रलंबित मागण्यांसाठीचे उपोषण ६ व्या दिवशी सुरूच आहे.उच्च न्यायालयाने 63 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शेत जमीन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी तात्काळ दयावी असे उच्च न्यायालयाचे आदेश झालेले असतानाही जिल्हा प्रशासनाची उदासीनता का?असा प्रश्न प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे.त्याच प्रमाणे गेली २५ वर्षे नवीन कुर्ली गावात हजारो लोक वास्तव करीत आहेत.ग्राम पंचायत नसल्याने त्यांना शासकीय कामांसाठी लागसणारे दाखले मिळत नाहीत.गावातील रस्ते,वीज व पाणी या मूलभूत गरजांसाठी शासना कडून निधी मिळत नाही.ग्राम पंचायत मंजूर व्हावी,पुनर्वसन गावठाणासाठी १८ नागरी सुविधा तात्काळ मंजूर करून मिळाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून रविवारी सहाव्या दिवशी उपोषण सुरूच आहे.
उपोषणास बसलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला पालकमंत्री उदय सामंत,आ.नितेश राणे , माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत ,माजी आमदार प्रमोद जठार , भाजपा जिल्हा जिल्हाध्यक्ष राजन तेली , शिवसेना नेते संदेश पारकर ,काका कुडाळकर , कणकवली सभापती मनोज रावराणे , कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे ,सोनू सावंत ,कुर्ली उपसरपंच संभाजी हुंबे यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन ऊन चर्चा केली.
देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत विस्थापित प्रकल्पग्रस्तांचे सन 1995 साली नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथे पुनर्वसन करण्यात आले. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या आदेशाने 2002 साली नवीन कुर्ली वसाहत गावठाण हे महसुली गाव राज्यपत्राने घोषित करण्यात आले. 1999 चा पुनर्वसन कायदा लागू असतानाही पुनर्वसन कायदा लागू केलेला नाही.नविन कुर्ली वसाहत गावठाण मधील 18 नागरी सुविधा अद्यापही प्रलंबित आहेत .गेली पंचवीस वर्षा पूर्वी प्रकल्पासाठी कुर्ली गावातील आपले पिढ्यान पिढ्या यांचे संसार उध्वस्त करून कवडीमोलाने शासनाला जमीनी दिल्या परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी अजूनही निराशाच आहे.लोकप्रतिनिधी फक्त आश्वासन देतात आणि प्रशासनातील अधिकारी मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला.जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत उपोषणाचा लढा सुरूच राहणार अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली .
उपोषणाला राजेंद्र कोलते, रविंद्र नवाळे,सुरज तावडे, प्रदीप कामतेकर ,कृष्णा परब, हरेश पाटील, अमित दळवी, योगिता मडवी, प्रमोद पोवार ,भगवान तेली ,पांडुरंग चव्हाण, एकनाथ चव्हाण ,प्रिया दळवी,नेहा पवार आदी प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणास बसले आहेत.
प्रकल्पग्रस्थाना प्रशासनाकडुन लेखी मागण्यांची पूर्तता होत नाही तो पर्यत उपोषण सुरूच राहणार अशी उपोषणाला बसलेल्या प्रकल्पग्रस्तनाची भूमिका आहे.