वैभववाडी :/-
उमेदकडून गावागावात बचत गटातील महिलांना काम करण्यास खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळाली आहे. रोजगाराची संधी उपलब्ध करून देत उमेदने महिलांना ताठ मानेने जगण्याची दिशा दिली आहे. त्यामुळे शासनाने उमेद अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी न करता त्यांना फेरनियुक्ती द्यावी. या मागणीचे निवेदन वैभववाडी तहसीलदार यांना कोकिसरे हिरकणी प्रभागाच्या महिलानी दिले आहे.
कोकीसरे जि.प. प्रभागातील सात गावांमध्ये उमेद अभियान अंतर्गत 186 समूह, 10 ग्रामसंघ आहेत. प्रभाग स्तरावर सर्व ग्रामसंघाचा मिळून हिरकणी प्रभागसंघ स्थापन करण्यात आला आहे. या स्वयंसहायता समूह चे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. यात गरीब कुटुंबांना रोजगार व उत्पन्नाच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. या समुहाच्या प्रगतीत उमेदचे भरीव योगदान राहिले आहे. मात्र सद्यस्थितीत उमेद मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा घाट शासनाकडून घातला जात आहे. हा प्रकार म्हणजे महिला बचत गटांना उद्ध्वस्त व बेदखल करणारा आहे. शासनाने कपातीचा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्यावा. याबाबतची शिफारस उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, ग्राम विकास व जलसंधारण विभाग महाराष्ट्र यांच्याकडे करण्यात यावी. अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी प्रभाग संघ अध्यक्ष सुरेखा चव्हाण, शीतल मेस्त्री, विद्या महाडिक, सुमिता काळे, दिपाली मोपेरकर, भूमी सावंत व महिला उपस्थित होत्या.
फोटो – नायब तहसीलदार श्री.अशोक नाईक यांच्याकडे निवेदन देताना हिरकणी प्रभागसंघातील महिला पदाधिकारी.