मुंबई /-

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील आधिश बंगल्याच्या बांधकामाचे सोमवारी तब्बल तीन तास मोजमाप व बांधकामाचे फोटो घेण्यात आले. यात काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम दिसून आले असून सीआरझेडचे उल्लंघन झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करूनच राणे यांना बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची नोटीस बजावण्यात येणार असल्याचे समजते.

नारायण राणेंचा ‘निलरत्न’ बंगलाही रडारवर!

दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करीत बंगला बांधकाम केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. कोकणातील बंगल्यावर कारवाईचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. अशात राणेंच्या बंगल्यावर हातोडा चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राणे कुटुंबियांचा मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर ‘निलरत्न’ बंगला आहे. केंद्र सरकारने याच बंगल्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. हा बंगला बांधतांना सीआरझेड-२ कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी केली असल्याने हे आदेश देण्यात आल्याचे कळते.

केंद्राने ९ ऑगस्ट २०२१ ला दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. तक्रारीची दखल घेत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला योग्य ती कारवाई चे आदेश दिले आहेत.मुंबई महापालिकेने बंगल्यावर कारवाईची तयारी केल्याने आक्रमक झालेले राणे कुटुंबीयांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page