You are currently viewing लोकराजा दशावतार नटसम्राट स्व. श्री. सुधीरजी कलिंगण यांना नेरूरवासिय ग्रामस्थांतर्फे शोकमग्न वातावरणात श्रद्धांजली अर्पण..!!

लोकराजा दशावतार नटसम्राट स्व. श्री. सुधीरजी कलिंगण यांना नेरूरवासिय ग्रामस्थांतर्फे शोकमग्न वातावरणात श्रद्धांजली अर्पण..!!

कुडाळ /-

काल सोमवार दिनांक २१ फेब्रूवारी, २०२२ रोजी नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत सभागृह येथे नेरूरमधील पदाधिकारी व ग्रामस्थांतर्फे अत्यंत शोकमग्न वातावरणात नेरूर गावचे सुपुत्र तथा दशावतार नाट्यकलेचे मानबिंदु लोकराजा स्व. श्री. सुधीरजी कलिंगण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दशावतार नाट्यक्षेत्रातील या सर्वांच्या आवडत्या लोकमान्य लोकराजाने सोमवार दिनांक ७ फेब्रूवारी रोजी पहाटे अचानक या जगाचा निरोप घेतला आणि अखिल नाट्यसृष्टी शोकसागरात बुडाली. आज तब्बल तेरा-चौदा दिवस उलटून सुद्धा या धक्क्यातून नाट्यरसिक, तसेच सिंधुदुर्गवासिय सावरलेले दिसत नाहीत. आजही प्रत्येकाच्या मनात त्यांच्या अचानक निघून जाण्यामूळे झालेल दुःख ताजं आहे.

लोकराजा श्री. सुधीरजी कलिंगण यांच दशावतार नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय कार्य कर्तृत्व आणि त्यांच्या अचानक निघून जाण्यामूळे दशावतार नाट्यक्षेत्राची अपरिमित अशी हानी झाल्याची भावना प्रत्येकजण व्यक्त करताना दिसतो.

मनमिळावू, सतत हसतमुख, दिलखुलास आणि माणसांत राहून प्रेमाने अनेक माणसं जोडणारं व्यक्तिमत्व म्हणून सुधीरजींची जनमाणसात खास ओळख आहे. त्यामूळेच एका गुणी कलावंताबरोबरचं एक उत्तम माणूस हरपल्याची हुहूर प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवत होती.

या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली मनोगतं देखील व्यक्त केलं. मनोगतं व्यक्त करत असताना सर्वांचाच कंठ दाटून येत होता. तरी देखील प्रत्येकजण आपल्या लाडक्या ‘राजा’प्रती आपली शब्दसुमनांजली अर्पण करत होता.

या शोकसभेसाठी पंचायतसमिती सदस्य श्री. संदेश नाईक, सरपंच श्री. शेखर गावडे, उपसरपंच श्री. समद मुजावर, माजी सरपंच श्री. चारूदत्त देसाई, बीट हवालदार श्री. शिंगाडे साहेब, पोलीस पाटील श्री. मेस्त्री, तंटामुक्त ग्रामसमिती अध्यक्ष श्री. प्रसाद पोईपकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. भक्ती घाडी, सौ. माधवी गावडे, अजित हडकर ओ.बी.सी.सेल जिल्हाप्रमुख श्री. रूपेशजी पावसकर,पोलिस पाटील गणपत मेस्त्री, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी तंटामुक्त ग्रामसिती अध्यक्ष श्री.भास्कर गावडे,प्रकाश तेंडुलकर सर, लोकप्रिय निवेदक मालवणी समलोचक श्री. बादलजी चौधरी, श्री. विनायक घाडी,प्रकाश करलकर, याशिवाय नेरूर गावामधील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, नाट्यकलावंत व रसिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या ओघवत्या व सुत्रबद्ध निवेदनाने श्री. निलेश गुरव यांनी केले. प्रास्ताविकपर भाषण श्री. सौरभ पाटकर यांनी करत जून्या आठवणींना उजाळा दिला. तर उपस्थितांचे आणि कलिंगण कुटूंबियांना सढळ हस्ते मदत करणा-या सर्वांचे नेरूर गावच्यावतीने आभार श्री. देवेंद्र गावडे यांनी मानले.

दशावतार नाट्यक्षेत्रासाठी अविरतपणे झटणा-या, आपले बहूमोल योगदान देऊन नेरूर गावचं नव्हे तर संपूर्ण कोंकणचे नाव उज्वल करणा-या कलिंगण कुटूंबियांच्या पाठीशी नेरूरवासिय ग्रामस्थ म्हणून खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही या प्रसंगी सर्व ग्रामस्थांनी दिली.

🔳🔳

अभिप्राय द्या..