You are currently viewing तौक्ते नुकसानग्रस्तांना येत्या दोन दिवसांत मिळणार.;आम.वैभव नाईक..

तौक्ते नुकसानग्रस्तांना येत्या दोन दिवसांत मिळणार.;आम.वैभव नाईक..

मालवण /-

काही महिन्यांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने अनेकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी म्हणून शासन प्रयत्नशील होते. काही नुकसानग्रस्तांना मदत मिळाली. काहींना पंचनाम्यापेक्षा कमी भरपाई प्राप्त झाली. या नुकसानग्रस्तांना उर्वरित मदत येत्या दोन दिवसात जमा होईल. यात ज्यांना मदत मिळाली आहे, त्याची पूर्ण यादी तहसीलदारांमार्फत जाहीर केली जाणार आहे. नुकसानग्रस्तांना जाहीर झालेल्या मदतीचा शेवटच्या लोकांपर्यंत लाभ मिळायला हवा, अशी आपली भूमिका आहे. त्यामुळे मच्छीमारांसह, घरांचे नुकसान तसेच माडबागायती, फळझाडांचे नुकसान झालेल्यांना लवकरच ही भरपाईची मदत मिळणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी येथे स्पष्ट केले.

मालवण तहसील कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी आढावा घेतला. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सरपंचाना केलेल्या सुचनांनुसार ज्यांचे नुकसान झाले, त्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ज्यांचे पंचनामे झाले व त्यांना मदत अद्याप मिळालेली नाही, अशा नुकसानग्रस्तांना मदत मिळवून दिली जाणार आहे. शिवाय ज्यांचे पंचनामे झाले नाहीत, त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.

तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नव्या तलाठी सजा अस्तित्त्वात आल्या आहेत. त्याठिकाणचे दफ्तर अद्याप जमा झालेले नाहीत. शिवाय काही ठिकाणी तलाठी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याबाबत सविस्तर चर्चा झाली. याबाबतची कार्यवाही लवकरच केली जाईल, असे तहसीलदार पाटणे यांनी यावेळी स्पष्ट केले. शिधापत्रिका तसेच विविध प्रकारच्या दाखल्यांच्या समस्येवर यावेळी चर्चा करण्यात आली.

वडाचापाट ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला आहे. याबाबत आमदार नाईक यांना विचारले असता त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांनी या ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था असल्याने याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. गावात जर ग्रामपंचायतीची आणखी एक इमारत होत असेल तर त्यासाठी लागणारा खर्च आमदार फंडातून उपलब्ध करून देऊ. गावच्या विकासात कोणतेही राजकारण न आणता आपण हा निधी देणार आहे. मात्र यात कोणीही राजकारण करू नये अशी आपली विनंती असल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

सध्या कोरोनाचे संकट असल्याने ग्रामसभा घ्यायच्या की नाही याबाबतचा निर्णय हा जिल्हा प्रशासनाचा आहे. यात गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेण्यास काही अडचण नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्रामसभा घेण्याबाबतचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावा. कारण सभा घेण्यासाठी सात दिवस अगोदर नोटीस, कोरोनाचे नियम हे सर्व पाळावे लागणार आहे. या प्रश्नासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. १५ ऑगस्टची ग्रामसभा झाली तर गावच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेता येणार आहेत. त्यामुळे ग्रामसभा होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत परंतु याबाबतचा निर्णय हा जिल्हा प्रशासनाने घ्यायचा आहे, असे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा