मुंबई /-

 कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.
 
मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून दि.४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. दि.१६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर दि.१४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे २२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असे श्री. परब यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी दि. ४ ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील. तर १४ ते २० सप्टेंबरदरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील म्हणजेच एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
 
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकदेखील तैनात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत असेही श्री. परब यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page