१२ वीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी.;संतप्त पालकांनी काढली क्लार्कची धिंड..

१२ वीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी.;संतप्त पालकांनी काढली क्लार्कची धिंड..

पुणे /-

पुण्यातील एका महाविद्यालयातील १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला गुण वाढवून देण्याच्या आमिषाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संतापलेल्या पालकांनी या क्लार्कला काळे फासत मारहाण केली. त्यानंतर त्याची महाविद्यालयातून विश्रामबाग पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. विश्रामबाग पोलिसांनी या क्लार्कला अटक केली आहे.

अभिजित पवार असे या क्लार्कचे नाव आहे. तो या महाविद्यालयात प्रशासकीय काम पाहतो.याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी सांगितले की, बिबवेवाडीत राहणारी एक १८ वर्षाची विद्यार्थीनी मध्य वस्तीतील एका नामांकित महाविदयालयात १२ वीमध्ये शिकत आहे. तिने मार्कलिस्टबाबत मंगळवारी पवार याच्याशी संपर्क साधला होता.त्यावेळी त्याने पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी अंतर्गत गुण वाढवून देतो, असे आमिष दाखवून कोठे प्रवेश घ्यायचा आहे, अशी विचारणा केली. तेव्हा या विद्यार्थिनीने आपल्याला पोलीस व्हायचे आहे, असे सांगितले. त्यावर पवार याने तिच्याकडे वाईट नजरेने पाहून लज्जास्पद बोलून शरीरसुखाची मागणी केली. या प्रकाराने ही विद्यार्थिनी घाबरुन गेली.महाविद्यालयातून ती घरी गेली. परंतु, पवार याच्या बोलण्यामुळे तिला रात्रभर झोप आली नाही. बुधवारी सकाळी तिने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. तिने आपल्या पतीला हे सांगितले. त्यामुळे तिचे पालक संतापले. ते सर्व दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महाविदयालयात गेले. त्यांनी पवार याच्याकडे या प्रकाराचा जाब विचारला. त्याला काळे फासले. त्याला बेदम मारहाण केले. त्यानंतर त्याला मारहाण करुन विश्रामबाग पोलीस ठाण्यात घेऊन आले. या प्रकाराने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकाराचा अनेकांनी निषेध केला आहे.

अभिप्राय द्या..