महाराष्ट्र राज्यात हरितक्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान.;एम. के. गावडे

महाराष्ट्र राज्यात हरितक्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान.;एम. के. गावडे

वेंगुर्ला /-


महाराष्ट्र राज्यात हरितक्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे.संकटाच्या काळात शासकीय मदतीचे धोरण लवचिक असले पाहिजे, हा विचार त्यांनीच दिला. कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाही.कर्ज घेत नाही आणि घेतले तर दुरुपयोग करत नाही. मात्र सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी खचून जात आहे.त्याला सरकारने वेळेत योग्य साथ देण्याची गरज आहे.यामुळे शासनाने शेतकऱ्यांना गृहीत धरू नये, ज्यादिवशी तो जागा होतो तेव्हा क्रांती होते हा इतिहास आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार प्राप्त एम. के. गावडे यांनी वेंगुर्ले येथे केले.हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती म्हणजेच कृषिदिन वेंगुर्ले – कॅम्प येथील महिला काथ्या कारखाना येथे साजरा करण्यात आला. यावेळी एम. के. गावडे यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तर जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्राप्त व जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब व कृषी पर्यवेक्षक विजय घोंगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, प्रगतशील शेतकरी प्रकाश गडेकर,
राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर,डॉ. संजीव लिंगवत,उद्योजक कमलेश गावडे,वामन कांबळी,सुजाता देसाई, श्रुती रेडकर, प्रथमेश गवंडे, कृषी सहाय्यक पल्लवी सावंत आदी उपस्थित होते.यावेळी आंबा पिकाचे योग्य नियोजन करणारे प्रगतशील शेतकरी प्रकाश गडेकर, नारळ शेतीत प्रगती करणारे युवा शेतकरी कमलेश गावडे व कृषी पर्यवेक्षक विजय घोंगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना
एम.के.गावडे म्हणाले की, सध्या शेती यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे.मात्र पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडत आहे.शेतकऱ्यांचे खरेदी केलेले भात उचल वेळेत होत नाही.नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने खतासाठी पैसे नाहीत.नुकसान भरपाई योग्य वेळेत मिळाली तर आता पुन्हा शेतकरी उभा राहिला असता.यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे,असेही यावेळी गावडे म्हणाले.कृषी विभागाने सुरू केलेल्या यू ट्यूब चॅनल विभागाची सर्व कामे आपल्याला पाहता येणार आहे. बियाणे, खते उपलब्धता याबाबतही माहिती मिळणार आहे.दरम्यान शेतकऱ्यांनी बोगस खत विक्री बाबत जपून राहावं. पालापाचोळा कुजवून, गुरांचे शेण वापरून तुम्ही जे तयार करतात तेच खत योग्य व सेंद्रिय खताला रासायनिक खतांची भर द्या,असे यावेळी कृषी पर्यवेक्षक विजय घोंगे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार गावडे यांनी केले.

अभिप्राय द्या..