अस्थिव्यंग लाभार्थ्यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष!

अस्थिव्यंग लाभार्थ्यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष!

मसुरे

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत अस्थिव्यंग व्यक्तींसाठी स्वयंचलित तीन चाकी सायकल योजनेसाठी सन २०२०-२१ या वर्षात लाभ मिळण्या पासून वंचित राहिलेल्या २० लाभार्थ्यांनि निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे लक्ष वेधले आहे. जिल्हा समाज कल्याण बैठकीत सभापती अंकुश जाधव यांनी पावसाळ्यापूर्वी उर्वरित लाभार्थ्यांना आदेश काढले जातील अशी माहिती देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही न झाल्याने अपंग लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर योजने नुसार मंजूर ४७ प्रस्ताव पैकी २७ लाभार्थ्यांना वाहन खरेदी आदेश देण्यात आल्याने उर्वरित २० अपंग बांधवांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे.
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत अस्थिव्यंग व्यक्तींसाठी स्वयंचलित तीन चाकी सायकल योजनेसाठी सन २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यातील एकूण ४७ लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी ८६ हजार प्रमाणे ४० लाख ४२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यात
दोडामार्ग पाच, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ले, वैभववाडी तालुक्यामधून प्रत्येकी सहा असे एकूण ४७ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. जि प ५ % सेस योजनेअंतर्गत स्वयंचलित तीन चाकी सायकल खरेदीसाठी अर्थ सहाय्य देणे ही योजना १००% अनुदानावर आहे.
दरम्यान ४७ प्रस्ताव मंजूर होऊन सुद्धा २० लाभार्थी या योजनेच्या लाभा पासून वंचित असल्याने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी याबाबत न्याय देण्याची मागणी या वीस लाभार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अभिप्राय द्या..