तोंडवळी टॉवरला नादुरुस्तीचे ग्रहण!

तोंडवळी टॉवरला नादुरुस्तीचे ग्रहण!

मसुरे

रेंज अभावी कोविड सेंटर मधील रुग्णांची होतेय गैरसोय

माजी सभापती उदय परब यांचा आंदोलनाचा इशारा

मालवण आचरा मार्गावरील तोंडवळी येथील बीएसएनलचा टॉवर वारंवार नादुरुस्त होऊन बंद पडत असल्याने रेंज अभावी कांदळगाव, हडी भागातील ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. चार चार दिवस टॉवरची रेंज सातत्याने गायब होत असल्याने ग्राहक अधिकाऱ्यांना घेराव घालण्याच्या पावित्र्यात आहेत. टॉवरच्या समस्या सध्याच्या कोरोना कालावधी पाहता तातडीने दूर करण्याची मागणी माजी सभापती उदय परब यांनी केली आहे.
तोंडवळी टॉवरला वाली कोण? अजून किती बीएसएनएल रिचार्ज लोकांची फुकट घालवणार? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. कोरोना महामारित कोणी आजारी पडले तर अत्यावश्यक वाहनांसाठी संपर्क साधने अवघड होतं आहे. बहुतांश ग्राहकांकडे बीएसएनएलची सिमकार्ड आहेत. गावी जेष्ठ ग्रामस्थ राहत असल्याने आपल्या घरातील वडील धाऱ्यांच्या तब्येतीची विचारपुस करून आवश्यक औषधे मुंबई व इतर ठिकाणांवरून पाठविली जातात. रेंज नसल्यास फोन द्वारे संपर्क होत नाही आहे. सध्या पावसाळ्यात एखादी आपत्कालीन दुर्घटना घडल्यास संपर्क कसा करायचा? कोविड साठी विलगीकरण कक्ष उभारल्या मुळे दाखल रूग्णास काही हवे असेल तर संपर्क साधता येत नाही आहे. अचानक तब्येत बिघडली तर वाहनांसाठी संपर्क करणे सुद्धा कठिण होते. या सर्व गंभीर बाबींची दखल घेऊन युध्दपातळीवरून सदर तोंडवळी टॉवर व्यवस्थित करावा. गेले सहा महिने सतत कांदळगाव हडीवासियांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे आज शिक्षण पद्धती ऑनलाईन झालेली आहे.त्यामुळे नेटवर्क अभावी विद्यार्थ्यांचे सुद्धा शैक्षणिक नुकसान होत आहे.
सदर टॉवरची दुरुस्ती ताबडतोब न झाल्याने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाल्यास होणार्‍या परिणामांना सदर अधिकारीच जबाबदार राहतील असा इशारा माजी सभापती उदय परब यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..