मसुरे /-
“वी फाॅर यू” संस्थेतर्फे पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने ग्रीन ड्रीम्स या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अविघटनशील वस्तूंपासून दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील अश्या वस्तू बनवायचा होत्या. स्पर्धेला मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथून भरभरून प्रतिसाद मिळाला . जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे-खालचीवाडी या शाळेतील इयत्ता-६वी मधील कु. चैतन्य संतोष शिरसाट याने तयार केलेल्या झाडांना पाणी घालायच्या झारी ला प्रथम क्रमांक देण्यात आला. या ऑनलाईन स्पर्धेचे परीक्षण माजी प्राध्यापिका सौ. अनुराधा अनिल महाजन यांनी केले.स्पर्धकांनी कल्पनाशक्तीचा वापर करून पेन स्टैंड , फुलदाणी , वॉटर टँक , अशा विविध वस्तू बनविल्या .तिवरे शाळेतील ११ मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. शाळा व्यव.समितीने विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले.समाजसेविका डाॅ. अलका नाईक(मुंबई)यांनी चैतन्यास रोख रू .५००/-चे बक्षिस जाहीर केले. या स्पर्धेसाठी त्याला केंद्रप्रमुख सौ.जुहिली सावंत,शिक्षक श्री.संदीप कदम,शाळेतील शिक्षक, पालक श्री.संतोष शिरसाट यांचे मार्गदर्शन मिळाले.
आपल्या दैनंदिन जीवनात अशा ‘टाकाऊतून टिकाऊ’ वस्तूंचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखूया व भारताचे जागरूक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडूया असे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आले. विजेत्याला पारितोषिक व सहभागी सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत.