मसुरेत बीएसएनएल सेवे सह वीज पुरवठा ठप्प..

मसुरेत बीएसएनएल सेवे सह वीज पुरवठा ठप्प..

मसुरे /-

तौक्तो चक्रीवादळाने मसुरेसह पंचक्रोशी मधील गावात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मसुरे कावावाडी, बाजारपेठ,टोकळवाडी सय्यदजुवा आदी भागातील काही ग्रामस्थांच्या राहत्या घरावर माड, आंबा झाडे कोसळून छपरांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. रविवारी दिवसभर वाहणाऱ्या वादळी वाऱ्यानी नागरिकांचा थरकाप उडविला होता. वाऱ्या सोबत मुसळधार पाऊस सुद्धा पडत असल्याने अनेक भागात माड, सुपारी, फणस, आंबा आदी उत्पन्नाची झाडे उन्मळून पडली आहेत. वादळात वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसएनएल चा मोबाइल टॉवर शनिवारी रात्री पासूनच बंद पडला असून लँड लाइन सेवा सुद्धा बंद पडली आहे.अनेक ठिकाणी झाडे थेट तारांवर पडल्याने सिमेंटचे विजेचे पोल मोडून पडले आहेत. मसुरे येथे येणाऱ्या मुख्य वीज वाहिनीवर सुद्धा ठीक ठिकाणी झाडे पडल्याने तारा तुटून गेल्या आहेत. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. मसुरे सह खाजणवाडी, चांदेर, मागवणे, देऊळवाडा, वेरली, बागायत, भोगलेवाडी, माळगाव, बांदिवडे, भगवंतगड, खोत जुवा आदी भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे अंशतः नुकसान झाले असून वित्त हानी सुद्धा झाली आहे. सोसाट्याच्या वाऱ्या मुळे आंबा बागायतदारांचे सुद्धा हजारो रुपयांचे नुकसान झाले असून झाडावरील तयार आंबा जमिनीवर पडून मातीमोल झाला आहे.

अभिप्राय द्या..