चौके:
सुमारे सहा वर्षे वारंवार मागणी आणि प्रतिक्षा करुनही चाफेखोल मुख्य रस्ता ते गावकरवाडी येथील ओहोळावर पूल बांधण्यासाठी शासकीय विकासनिधी मंजूर न झाल्यामुळे अखेर चाफेखोल गावकरवाडी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून सुमारे २१ लाख रुपये अपेक्षित खर्चाचा पूल बांधण्याचा संकल्प केला. अखिल भारतीय गाबीत समाज शाखा मालवण चे सल्लागार आणि पडवणे , देवगडचे माजी सरपंच महेश जुवाटकर यांच्या प्रमुख सहकार्याने आणि प्रेरणेतून गावकरवाडी ग्रामस्थांनी सदर पूल बांधण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. घाडीगावकर परिवारांची दहा घरे आणि सुमारे ४० लोकवस्ती असलेल्या गावकरवाडीला जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर मध्येच ओहोळाच्या पाण्यातून जावे लागत होते या त्रासातून सुटका व्हावी म्हणून गावकरवाडी ग्रामस्थांनी स्वतः पूल बांधण्याचा निर्णय घेतला.
सदर रस्त्यावरील ओहोळावर बांधण्यात येणाऱ्या या पुलाच्या कामाचे भूमिपूजन १ जानेवारी रोजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बापू घाडीगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चाफेखोल सरपंच सौ. रिता वायंगणकर , अखिल भारतीय गाबीत समाज शाखा मालवण चे सल्लागार तसेच पडवणे , देवगडचे माजी सरपंच महेश जुवाटकर , आनंद वराडकर , दादा नाईक , शशिकांत घाडीगावकर , प्रकाश सकपाळ , बळीराम शिंदे , प्रफुल्ल पवार , रामचंद्र पवार, सूर्यकांत घाडीगावकर , माळगाव सरपंच निलेश खोत, ओम गणेश सुशिक्षित बेरोजगार विविध सेवा सह. संस्था मालवण चे नितिन माणगावकर , अर्जुन परब, वामन जाधव, रविंद्र गोसावी, आनंद घाडीगावकर, सचिन घाडीगावकर , रमेश घाडीगावकर , संदिप घाडीगावकर , उमेश घाडीगावकर , मंगेश घाडीगावकर , किशोर घाडीगावकर , आदी जण उपस्थित होते.
गावकरवाडी ग्रामस्थांच्या या संकल्पाला अनेक मदतीचे हात पुढे आले असून आतापर्यंत सुमारे १३ लाख रुपये निधी जमा झाला असून काही जणांनी वाळू खडी, स्टील तसेच सिमेंट वस्तूस्वरूपात देण्याचे जाहीर केले आहे. असे महेश जुवाटकर यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून एखादे अशक्य कामही कसे सहज शक्य करता येते याचा आगळावेगळा आदर्श चाफेखोल गावकरवाडी ग्रामस्थांनी समाजासमोर घालून दिला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना महेश जुवाटकर यांनी चाफेखोल गावकरवाडीच्या विकासासाठी विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून १ करोड रूपयांचा फंड गोळा करून देण्याचा संकल्प असल्याचे जाहीर केले. तसेच आपण हाती घेतलेला पूल बांधण्याचा संकल्प गावकरवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने निश्चित पूर्ण करू असा विश्वासही जुवाटकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page