सावंतवाडी /
आंबोली जाधववाडी येथे भरवस्तीत घुसलेल्या बिबट्याने बाप-लेकासह एकूण पाच जणांवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्या दोघे गंभीर जखमी झाले असून अन्य तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. त्या सर्वांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशोक जाधव व अक्षय जाधव अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर कृष्णा जाधव, शिकम जाधव अशी अन्य जखमींची नावे आहेत.
गावातील कुत्र्यांच्या शोधात हा बिबट्या रात्री गावात आला व जाधव यांच्या घरा समोर असलेल्या मांगरात तो दबा धरून बसला होता. त्यानंतर भुकेलेल्या असलेल्या बिबट्या कडून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आंबोली वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव हे आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले असून त्यांनी जखमींची चौकशी केली आहे. वनविभागाकडून जखमींना त्वरित मदत करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.