मालवण /-
निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेच्या कोळंब येथील गेस्ट हाऊसमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव निलक्रांती संस्थेकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.
निलक्रांती मस्त्य व कृषी सहकारी संस्था ही नोंदणीकृत शासनमान्य संस्था असून संस्थेचे कोळंब, मालवण याठिकाणी गेस्ट हाऊस आहे. या जागेत संस्थेस कोव्हिड केयर सेंटर सुरू करण्याचा मानस आहे. यापूर्वी संस्थेच्या कांदळगाव येथील मल्टिपर्पज केंद्रामध्ये रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर च्या सहकार्याने Dedicated Covid Health Center द्वारे करोना बाधितांना सेवा दिली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना बाधितांना सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून संस्थेच्या कोळंब, मालवण याठिकाणी कोव्हिड केयर सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी संस्थाध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या केंद्रातील रुग्णांना आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सोयी सुविधा पुरविण्यासाठी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर, मालवण तसेच इतर वैद्यकीय व्यावसायिकांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच हे केंद्र पूर्णपणे शासकीय नियमावली पाळून चालविण्यात येईल, असेही तोरसकर यांनी म्हटले आहे.
खासगी संस्थेने दिलेला अशाप्रकारचा पहिलाच प्रस्ताव असून प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास होम आयसोलेशन शक्य नसलेल्या रुग्णांना उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे. या केंद्रात आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधा बरोबरच तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, आहारतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, योगसाधना, निसर्गोपचार यांचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता या केंद्रास लवकरात लवकर प्रशासनाकडून लवकरच परवानगी मिळेल, अशी आशा श्री. तोरसकर यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page