शिवजयंतीच्या निमित्ताने ‘पुन:श्‍च व्हावे, हिंदवी स्वराज्य !’ या विषयावर विशेष संवाद !

शिवजयंतीच्या निमित्ताने ‘पुन:श्‍च व्हावे, हिंदवी स्वराज्य !’ या विषयावर विशेष संवाद !

शिवरायांनी राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमकांचा बिमोड करत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले ! – श्री. मोहन शेटे, अध्यक्ष, इतिहासप्रेमी मंडळ

सिंधुदुर्ग /-

छत्रपती शिवरायांनी अभंग-कीर्तनात वाढलेल्या सात्विक लोकांमध्ये क्षात्रतेज जागवले. त्यांना जिहादी लुटारू आक्रमकांविरोधात संघटित केले. शिवछत्रपतींनी स्वराज्यावरील शत्रूंच्या विरोधात युद्ध करून विजय प्राप्त करतांना धर्माकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. तामिळनाडूच्या दौर्‍यावर असतांना तिरुवन्नामलाई येथे मोगलांनी दोन मोठी मंदिरे पाडून तेथे मशीद उभारल्याचे लक्षात येताच महाराजांनी त्या मशिदी पाडून पुन्हा तेथे मंदिरे पुनर्स्थापित केली. गोव्यात श्री सप्तकोटेश्‍वर मंदिराची विटंबना पोर्तुगिजांनी केली होती. ते मंदिरही शिवरायांनी पुन्हा उभे केले. मराठी भाषेत घुसलेले उर्दु-फारसी शब्द काढण्यासाठी मराठी भाषेतील राज्यव्यवहारकोश निर्माण केला. तेव्हाच्या प्रचलित ‘हिजरा’ या इस्लामी कालगणनेचा वापर थांबवून स्वतःची हिंदु कालगणना चालू केली. थोडक्यात छत्रपती शिवरायांनी केवळ भूमीचा तुकडा घेऊन राज्य निर्माण केले नाही; तर राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आक्रमकांचा बिमोड करत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले, असे स्पष्ट प्रतिपादन ‘इतिहासप्रेमी मंडळा’चे संस्थापक अध्यक्ष श्री. मोहन शेटे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने ‘पुन:श्‍च व्हावे, हिंदवी स्वराज्य !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन विशेष संवादा’त ते बोलत होते. या वेळी फेसबूक आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमांतून हा कार्यक्रम 17,300 जणांनी पाहिला.

या वेळी हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ उत्तम प्रशासक नव्हेत, तर ते हिंदु धर्मानुसार प्रशासन चालवणारे म्हणजे उत्तम हिंदु प्रशासक होते. आज साम्यवादी विचारांचे लोक ‘शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी नव्हते, तर ते सेक्युलर राजा होते’, असा प्रचार करून हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. कदाचित कालर्र् मार्क्स हा त्या काळात जन्माला आला असता, तर ‘त्याची आणि महाराजांची भेट झाली होती. महाराजांनी त्यांच्या सूचनेनुसार राज्य स्थापन केले’, असा खोटा प्रचारही डाव्यांनी चालू केला असता; परंतु महाराज हिंदु धर्माचे पाईक असल्याने त्यांनी धर्मानुसार राज्याभिषेक केला. राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळामध्ये ‘पंडितराव’ हे धर्माधिकारी स्वरूपाचे पद निर्माण केले. या पदावरील व्यक्तीला ‘न्याय प्रक्रिया धर्मानुसार चालू आहे ना’ हे पहाण्याचे दायित्व होते.

या वेळी बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे जळगाव येथील समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर म्हणाले की, पाच मोगली पातशाह्यांद्वारे सर्वत्र मंदिरांची विटंबना, महिलांवर अत्याचार, गोहत्या होत असतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री रायरेश्‍वराच्या मंदिरात केवळ मंदिरांचे वा गायींचे रक्षण करेन, अशी प्रतिज्ञा केली नाही, तर ‘हिंदवी स्वराज्याची स्थापना करीन’, अशी प्रतिज्ञा केली. त्यामुळे त्यांच्या राज्यात मंदिरे, गायी, महिला आणि प्रजा आदी सुखी होते. आपल्याला शिवछत्रपतींच्या या मार्गाचे अनुसरण करून ‘पुन:श्‍च हिंदवी स्वराज्य’ अर्थात् ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी कृतीशील व्हायचे आहे.

अभिप्राय द्या..