आंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांना प्रवेश नाहीच! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आंगणे कुटुंबियांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

आंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांना प्रवेश नाहीच! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आंगणे कुटुंबियांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

मसुरे /-

कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा ६ मार्च रोजी होणार जत्रोत्सव केवळ वार्षिक धार्मिक विधी पूर्ण करत साजरा करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. सोमवारी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडीचे पदाधिकारी व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे.
‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला अनुसरून ‘माझी जत्रा, माझी जबाबदारी’ या भावनेने सर्वांनी जत्रोत्सवा बद्दल घेतलेल्या निर्णयाला सहकार्य कळावे. आंगणे कुटुंबीयांनी यात्रा कालावधीत होणाऱ्या धार्मिक विधी साठी जिल्हा प्रशासनाची आवश्यक ती परवानगी घेणे आवश्यक राहील असे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
दरम्यान यापूर्वीच २९ डिसेंबर २०२० रोजी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी देवीच्या हुकमाने यात्रेची तारीख निश्चित केली होती. तसेच यात्रोत्सव आंगणेवाडी ग्रामस्थां पुरता मर्यादित ठेवण्यात आल्याचे जाहीर केले होते. कोरोना महामारीमुळे देवीच्या भक्तांनी यावर्षी यात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी न येता आपल्या घरूनच देवीचे मनोमन स्मरण करत प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या कोरोना संबंधित नियमांमुळे बाहेरील भक्तांना यात्रा कालावधीत देवीचे दर्शन तसेच यात्रोत्सवासाठी आंगणेवाडीत येता येणार नसल्याचे अधिक स्पष्ट झाले आहे.
देश विदेशातील श्री भराडी देवीच्या भक्तांना उत्सुकता असते ते देवीच्या वार्षिकोत्सवाची अर्थात जत्रोत्सवाची. हा जत्रोत्सव कोणत्याही तिथी अथवा तारखेवर होत नाही तर देवीचा कौल घेऊन जत्रेची तारीख निश्चित करण्यात येते. विविध क्षेत्रातील अनेक महनीय व्यक्ती या जत्रोत्सवास उपस्थिती दर्शवतात व देवीचे आशीर्वाद घेतात. भाविकांच्या होणा-या गैरसोयी बद्दल दिलगीरी व्यक्त करतानाच आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री देवी भराडी मातेस आपलं सांगण सांगावं, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल अशी भाविकांना नम्र
विनंती आंगणे कुटुंबिय, आंगणेवाडी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..