मसुरे भोगलेवाडीत भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहिरीत!

मसुरे भोगलेवाडीत भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहिरीत!

मसुरे /-

मसुरे भोगलेवाडी येथे भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप विहिरी बाहेर काढत जीवदान दिले आहे. मसुरे भोगलेवाडी येथील सुरेश रावराणे यांच्या कुत्र्याच्या मागावर सदर बिबटा वस्तीत आला होता. कुत्र्यांच्या जोरदार भुंकण्यामुळे राणे यांना पहाटे ३ च्या सुमारास जग आली. घराबाहेरील लाईट चालू करताच सदर बिबट्याने धूम ठोकली होती. काही वेळातच पुन्हा कुत्र्यांचा आवाज आल्याने ग्रामस्थांनी कानोसा घेतला असता लगतच्या गजानन भोगले यांच्या सुमारे वीस फूट खोल विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी पोलीस पाटील गोविंद सावंत याना संपर्क साधत वनविभागाला कळविले. विहिरीत असलेल्या पंपाच्या पाईपला पकडून सदर बिबटा कसाबसा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. शनिवारी सकाळी ७.३०च्या सुमारास मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक सारीक फकीर, गुरुनाथ आचरेकर, चेतन मयेकर यानि विहीरीत पिंजरा सोडत बिबट्याला विहिरी बाहेर काढले. यावेळी ग्रामस्थांनी सहकार्य केले.पशुवैधकीय अधिकारी डॉ वेर्लेकर यांनी आरोग्य तपासणी केली. वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या..