आचरा
आचरा बंदर येथील मासेमारी बोटीवर काम करणाऱ्या खलाश्याचा मृतदेह आचरा खाडीत आढळून आला आहे. हा खलाशी राहत्या ठिकाणावरून रविवार पासून बेपत्ता होता. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आचरा खाडीत आढळुन आला. याबाबतची खबर आचरा पोलीसपाटील विट्ठल धुरी यांनी आचरा पोलिसांना दिली.
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आचरा बंदर येथील एका मासेमारी बोटीवर काम करणारा खलाशी ललित प्रफुल्ल किसान वय 22 मूळ राहणारा ओडिशा हा रविवार दि 20 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास जेवण आटपून घराकडून बाहेर पडून गेला होता . तो परत आला नसल्याने त्याची शोधाशोध चालू होती. मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास त्याचा मृतदेह इब्राहीम खलिल दर्गा समोरील खाडीच्या पाण्यात तरंगता आढळून आला. पोलीस पाटील धुरी यांनी खबर दिल्यानंतर आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे घटनास्थळी दाखल झाले होते. त्याचा मृतदेह बाहेर काढून मालवण येथे शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईक येण्यास विलंब असल्याने त्याचा मृतदेह मालवण येथे शवागृहात ठेवण्यात आला आहे. आचरा ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बाळू कांबळे, देसाई करत आहेत.