कुडाळात हिंदू जनजागृती समितीने वेधले तहसीलदार पोलिस प्रशासनाचे लक्ष

कुडाळ /-

गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक अन् सार्वजनिक ठिकाणी 25 व 31 डिसेंबर रोजी मद्यपान, धूम्रपान, पार्ट्या करणे व फटाके फोडण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढण्यात यावा पोलिसांची गस्तीपथके नेमून याचे उल्लंघन करणाऱ्यां कारवाई करावी.या रात्री राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर जाण्यास मज्जाव करण्यात यावा.अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ तहसिलदार तसेच पोलिस प्रशासन यांच्या कडे करण्यात आली. 25 डिसेंबर व 31 डिसेंबर रोजी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ तहसिलदार, पोलिस प्रशासन, कुडाळ नगरपंचायत, कुडाळ महाविद्यालय यांना निवेदन देऊन याबाबत सबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. कुडाळ तहसिलदार अमोल पाठक व कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांना हे निवेदन सादर करण्यात आले .हिंदु जनजागृती समिती ही राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती करणारी सेवाभावी संस्था आहे. समिती सार्वजनिक उत्सव आणि इतर कार्यक्रमांत होणाऱ्या गैरप्रकारांबद्दल उदा. राष्ट्रध्वज, राष्ट्रीय प्रतिके आणि मानचिन्हे यांची विटंबना रोखणे, फटाक्यांद्वारे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण, तसेच देवतांची विटंबना थांबवणे अशा विविध विषयांमध्ये गेली १८ वर्षे जनजागृती करत आहे. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांना साहाय्यही करत आहे.३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होत आहेत. गंभीर बाब म्हणजे या रात्रीपासून मद्य पिण्यास आरंभ करणाऱ्या युवापिढीचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांचाही समावेश आहे. रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण करणे, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावणे, अश्लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, मुलींची छेडछाड-विनयभंग-बलात्कार आदी कुकृत्ये करून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. त्याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवर येतो. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला आहे. अनेक तज्ञ कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या काळात फटाके फोडल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढून श्वसनाचे त्रास वाढतात. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे २५ डिसेंबर, ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी किंवा ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’ वर) बंदी घालावी. या रात्री राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर जाण्यास मज्जाव करण्यात यावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान-धूम्रपान अन् पार्टया करण्यावर प्रतिबंध आणावा. पोलिसांची गस्तीपथके नेमून याचे उल्लंघन करणाऱ्यां कारवाई करावी. तसेच येत्या ३१ डिसेंबर या दिवशी राज्यातील किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, पाट्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा. तसेच या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाचे नियोजन करून सुसंस्कृत आणि नीतीमान समाज घडवण्यास सहकार्य करावे, या विधायक कार्यात साहाय्याची आवश्यकता भासल्यास हिंदु जनजागृती समिती यासाठी तत्पर असेल अशी माहिती हिंदू जनजागृती समितीच्या वतीने या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page