ठाणे: काम संपवून मोटरसायकलवरून घरी निघालेल्या ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई सतीश चव्हाण यांच्या मोटरसायकलला अन्य एका वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री भिवंडीतील मानकोली परिसरात घडली. गंभीर बाब म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेला वाहन चालक अपघातानंतर पळून गेला असून, या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती असलेले सतीश चव्हाण (३१) ठाण्यातील खारेगाव परिसरात पत्नी आणि दोन मुलांसोबत राहात होते. तर आई, वडील आणि भाऊ लातूर जिल्ह्यातील देवताळा या गावी राहतात. भिवंडीतील खारबाव पोलीस चौकी येथील ड्युटी संपवून शनिवारी रात्री चव्हाण मोटरसायकलवरून घरी निघाले होते. रात्री ११.३० वाजता भिवंडीतील माणकोली पूल ओलांडून पुढे २०० मीटरवर त्यांची मोटरसायकल आल्यानंतर भरधाव वेगातील अन्य एका वाहनाने जोरदार धडक दिली.
या अपघातामध्ये चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर आरोपी चालक पसार झाला. या प्रकरणी त्याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.