चिपी विमानतळावरून जानेवारी अखेर पर्यंत उड्डाण

चिपी विमानतळावरून जानेवारी अखेर पर्यंत उड्डाण

केंद्रीय विमान राज्यमंत्री हरदीप पुरी यांचे माजी मंत्री सुरेश प्रभू याना आश्वासन

सिंधूदुर्गनगरी /-

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील उड्डाणाच्या प्रतिक्षेत असलेले चिपी विमानतळ जानेवारी २०२१ अखेर कार्यान्वित होईल, असे लेखी आश्वासन केंद्रीय विमानन राज्यमंत्री हरदीप पूरी यानी माजी केंद्रीय मंत्री खा सुरेश प्रभू यांना १२ डिसेबर रोजी दिले आहे. याबाबत खा प्रभू यानी ३ डिसेबर रोजी लेखी पत्र लिहित चिपी विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अपरिहार्य असलेला सिंधुदुर्ग विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होण्याकरिता खा सुरेश प्रभू यांनी केंद्रीय नागरी विमानन मंत्री हरदीप पुरी यांना व्यक्तिश: विनंतीपत्र पाठवले होते. या पत्राची तत्परतेने दखल घेऊन मंत्री पूरी यानी सिंधुदुर्ग विमानतळाच्या विकासकार्याशी संबंधित कार्यवाहीला वेग देण्यात आल्याबाबत खा प्रभू यांना व्यक्तीश: पत्र पाठवून अवगत केले आहे. नागरी विमानन संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी चिपी, सिंधुदुर्ग विमानतळाला भेट देऊन परवाना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या आयटी यंत्रणा, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचे कार्यान्वन, प्रशिक्षित अग्निशमन दल अशा काही बाबींची त्वरित पूर्तता करण्याचे निर्देश विमानतळाच्या विकासकांना दिले आहेत. खा प्रभू यांनी नागरी विमाननमंत्री असताना देशांतर्गत विमानवाहतूक मार्गांसाठी कार्यान्वित केलेल्या उडान या योजनेअंतर्गत अलायन्स एअर या विमानकंपनीला चिपी विमानतळावरील उड्डाणांसाठी परवानगी दिली गेली आहे. चिपी, सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाचे अधिकांश काम नजीकच्या काही वर्षांमध्ये पूर्ण झालेले असून विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी जानेवारी २०२१ अखेर हे लक्ष्य ठेवले गेले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व भागधारकांशी आवश्यक तो समन्वय साधावा याकरिता केंद्रीय नागरी विमानन मंत्रालयाने महाराष्ट्र राज्यशासनाला विनंती केली आहे.

अभिप्राय द्या..