मालवण /-
सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या मालवण रॉक गार्डन येथे नगरपालिकेच्या वतीने कोकणातील एकमेव असा म्युझिकल फाउंटन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
मालवण शहरातील विविध प्रकल्प आणण्यासाठी, शहरात सोयी सुविधा अधिक निर्माण करण्यासाठी आम. वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत व सहकारी सर्व नगरसेवक शासन-प्रशासन स्तरावर करत असलेला पाठपुरावा, धडपड कौतुकास्पद आहे. त्याच प्रयत्नातून मालवण शहरात कोट्यवधी रुपये निधी मंजूर झाला आहे. म्युझिकल फाउंटन तर पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल. मालवणच्या विकासासाठी भविष्यातही निधी कमी पडू देणार नाही. रॉक गार्डनसह मालवण शहर कोकणातील आदर्शवत पर्यटनस्थळ बनविण्यासाठी आपला प्रयत्न राहील. असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्युझिकल फाउंटन लोकार्पण प्रसंगी व्यक्त केला.
जिल्हा वार्षिक योजना १ कोटी पर्यटन निधीतून म्युझिकल फाउंटन प्रकल्प सुमित इलेक्ट्रिकल सर्व्हिस यांनी दर्जेदार पद्धतीने रॉक गार्डन येथे साकारला आहे. कलरफुल लाईट अन मुझिकच्या तालावर उडणारे पाण्याचे फवारे निश्चितच पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहेत.
लोकार्पण सोहळा प्रसंगी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर व बांधकाम सभापती यतीन खोत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हास्तरीय नेते संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे, बबन शिंदे, तालुकाप्रमुख सदस्य हरी खोबरेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, नितीन वाळके, दीपक पाटकर, पंकज सादये, गणेश कुशे, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, आरोग्य सभापती पूजा सरकारे, तृप्ती मयेकर, पूजा करलकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटये, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, काँग्रेसचे बाळू अंधारी, पल्लवी तारी व इतर प्रमुख मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
यावेळी खास. विनायक राऊत म्हणाले, मालवणचे सौंदर्य विविधांगाने वाढविणे हे आमचे कर्तव्य आहे. मालवणचा विकास आता लाखात राहिलेला नाही तर तो कोटी मध्ये गेला आहे. मालवण जसे पर्यटनाचे केंद्र आहे. तसे येत्या काळात मालवण हे जिल्ह्याच्या विकासाचे केंद्र राहील, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
पाच मिनिटात एक कोटी देणारे पालकमंत्री
मालवण रॉक गार्डन येथे म्युझिकल फाउंटन प्रकल्प प्रस्ताव तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात एक कोटी निधी मंजूर करण्यात आला. ही विशेष आठवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले. दरम्यान आपल्या भाषणात आमदार केसरकर म्हणाले मी पालकमंत्री असताना जिल्ह्यात सर्वच ठिकाणी निधी दिला. मात्र आठवण ठेवणारे मालवणचे नगराध्यक्ष एकमेव असे केसरकर यांनी सांगितले.