▪️जिएमसी ब्लड बँकेचे शिबीर तालुक्यातील तळकट ग्रामीण भागात प्रथमच..
✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळकट न.१ शतक महोत्सव समिती व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास एकूण ५४ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या माजी विद्यार्थी,शिक्षक,शिक्षणप्रेमी व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.हे रक्तदान शिबिर तळकट शाळा नं १ येथे संपन्न झाले.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन जिएमसी ब्लड बँकेचे डॉ संजय कोरगावकर,तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ चिपळूणकर,सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सावंतवाडी – दोडामार्ग तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर,तालुका उपाध्यक्ष सौ गीतांजली सातार्डेकर,सचिव संतोष सातार्डेकर,अजित देसाई,सरपंच सुरेंद्र सावंत,ज्येष्ठ नागरिक उत्तम देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले.तर देवी सरस्वतीच्या प्रतिमेस सौ गीतांजली सातार्डेकर यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी सौ गीतांजली सातार्डेकर यांनी उपस्थित महिलांना हिमोग्लोबिन वाढीबाबत मार्गदर्शन केले.तर जिएमसीचे डॉ कोरगावकर यांनी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर हे सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला तालुक्यात सातत्याने शिबिरे घेण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून मेहनत घेत असल्याबाबत विशेष अभिनंदन केले.
यावेळी संजय पिळणकर यांनी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या समाजाभिमुख कार्याचे थोडक्यात विश्लेषण करताना ही संस्था रक्तदान,अवयवदान व देहदानासाठी समाजात सातत्याने जनजागृती करीत असून,या संस्थेच्या माध्यमातून अतिशय दुर्मिळ असलेला बॉम्बे ब्लड ग्रुपचे आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ व्यक्तींचा शोध लावण्यात यश आले असून देशात या रक्तगटाचे जवळपास फक्त २०० व्यक्ती आहेत.जिल्ह्यात या रक्तगटाचे व्यक्ती व डोनर फक्त सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानकडेच असून हा एक संस्थेचा जागतिक विक्रम आहे.
हे भव्य शिबीर यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष – दुर्गाराम गवस,सचिव – मनोहर झेंडे,खजिनदार – रामदास देसाई,कार्याध्यक्ष – दिपक मळीक, तसेच सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सदस्य
गोविंद गवस आणि सरपंच सुरेंद्र सावंत,मुख्याध्यापक अरुण पवार,तसेच सर्व ग्रामस्थ,संतोष देसाई,रामचंद्र नाईक,गोविंद देसाई,दत्तप्रसाद सावंत,प्रजोत देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गोविंद उर्फ आबा गवस यांनी मानले.तर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सौ गवस मॅडम यांनी केले.