▪️लखमराजे भोसले; सावंतवाडीतील विश्व डान्स अ‍ॅकेडमीचा वर्धापनदिन उत्साहात…

✍🏼 लोकसंवाद /- सावंतवाडी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक कलाकार आहेत. त्यांच्या अंगातील कलागुणांना वाव देण्यासाठी अकादमीच्या धर्तीवर या ठिकाणी एखादे “सेंटर” होण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहे, असे मत सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी येथे व्यक्त केले. दरम्यान सावंतवाडी संस्थानाने कायम कलाकारांना पाठबळ दिले आहे. यापुढे ही नवोदित कलाकारांना घडविण्यासाठी राजघराण्याचे योगदान कायम राहिल, असे ही त्यांनी सांगितले.

विश्व डान्स अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रध्दाराणी भोसले, ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, पुजा दळवी, चित्रा बाबर-देसाई,अ‍ॅड. सायली दुभाषी, जेष्ठ कलाकार कल्पना बांदेकर, विश्व डान्स अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष तुळशीदास आर्लेेकर, संचालिका शितल आर्लेकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. भोसले म्हणाले, या ठिकाणी विश्व डान्स अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून भरत नाट्यम ही दाक्षिणात्य कला या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न श्री. आर्लेकर व त्यांच्या सहकार्‍यांकडुन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे कौतूक करावे तितके थोडेच आहे. जिल्ह्यातील कलाकाराच्या अंगात मोठ्या प्रमाणात कलागुण आहेत आणि ते बाहेर येण्यासाठी विश्व डान्स अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

यावेळी श्री. टेंबकर म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून श्री. आर्लेकर यांनी आपला प्रवास सुरू केला. कोकणातील भरतनाट्यम करणारे व शिकविणारे ते एकमेव पुरूष कलाकार आहेत. त्यांनी आपल्या माध्यमातून अनेक कलाकारांना घडविण्याचे काम केेले आहे. त्यांचा हा प्रवास असाच पुढे सुरू रहावा. यावेळी या वर्धापन दिनाचे औचित्यसाधून आर्लेकर दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभम धुरी तर आभार श्री. आर्लेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page