मालवण /_
जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरील हरकतींची ऑनलाईन जनसुनावणी घेण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. मात्र या ऑनलाइन सुनावणीमध्ये मोठ्या संख्येने विविध ठिकाणचे नागरिक एकत्र येणार असल्याने यातून कोरोना संक्रमण वाढल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल मालवण पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे यांनी उपस्थित केला आहे. ही जनसुनावणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. पाताडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याबाबत तालुक्यातील जनतेसाठी ऑनलाईन जनसुनावणी सोमवारी मालवण पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. या जनसुनावणीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहिल्याने येथील बैठक व्यवस्था अपुरी पडली. तसेच ऑनलाईन जनसुनावणी जिल्ह्या वरून तांत्रिक कारणाने होऊ शकली नाही. सदर ऑनलाईन जनसुनावणी फेल ठरल्याने जिल्हा प्रशासनाने आता प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे. त्यात मालवण पंचायत समिती सभागृहात मालवण, देवगड व कणकवली तालुक्यांची जनसुनावणी तीन वेगवेगळ्या वेळात घेणार असल्याचे नियोजन आहे. परंतु आजच्या ऑनलाईन जनसुनावणीसाठी झालेली तोबा गर्दी पहाता उद्या प्रत्यक्ष सुनावणीस मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता आहे. मालवण पंचायत समितीच्या सभागृहात इतरवेळी ३० नागरिक व कोरोना संक्रमणामुळे सोशल डिस्टंसिंग पाळता केवळ १५ नागरिकांची बैठक व्यवस्था होऊ शकते. सध्या कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनियंत्रित गर्दीमुळे संक्रमण वाढीचा धोका अधिक संभवतो. या जनसुनावणीवेळी कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास जबाबदार कोण ? तरी सदर जनसुनावणी घाईने न घेता प्रत्येक तालुकावार संक्रमण कमी झाल्यावर मोठ्या क्षमतेच्या सभागृहात घेण्यात यावी, अशी मागणी अजिंक्य पाताडे यांनी केली आहे.