आचरा–अर्जुन बापर्डेकर
गेले काही दिवस आचरा भागात पावसाने उसंत घेतल्याने लावणीची कामे खोळंबली आहेत. मात्र मळेभागातील साचलेले पाणी कमी झाल्याने या भागात लावणीला वेग आला आहे.तर भरड शेती भागात पावसाने उसंत घेतल्याने भूईमुग लागवडीनंतर आता नाचणी(नागली) लागवडीची लगबग सुरू झाली आहे.आचरे भागात भात लागवडी बरोबरच महत्त्वाचे पिक म्हणून भुईमूग, नागली ची लागवड केली जाते.कष्टाची लागवड म्हणून मधल्या काळात नागली ची लागवडीकडे शेतकरी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत होते. मात्र आहारातील नागलीचे महत्त्व लोकांच्या लक्षात आल्याने वाढत्या मागणी मुळे नागली पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. या पिकाची लागवड वरकस जमिनीत केली जाते.नांगरणी करून जमीन भुसभुशीत केल्यावर जमिनीवर शेणखत पसरले जाते. कुदळीने च-या मारत उगवून काढलेली नाचणी (नागली)ची रोपे लावली जातात.सध्या पावसाने उसंत घेतली असल्याने नागलीच्या लागवडीकडे शेतकरी वळला आहे. यामुळे शेतशिवारात वर्दळ वाढली आहे.