You are currently viewing शिवसेनेने भाजपासोबतच जावे ही आजही माझी भूमिका आमदार दिपक केसरकर

शिवसेनेने भाजपासोबतच जावे ही आजही माझी भूमिका आमदार दिपक केसरकर

मुंबई /-

शिवसेनेेने भाजपासोबत जावे, ही आजही माझी भूमिका आहे. यासाठी गेली दोन वर्षे मी प्रयत्न करीत आहे. या संदर्भात आजही चाललेल्या चर्चेत माझा खारीचा वाटा आहे. त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरेंनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत सिंधुदुर्गचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. दरम्यान मला जायचे असेल तर मी आज ही जावू शकतो. मला कोणीही अडवू शकत नाही. त्यासाठी “मी” कोणाची दादागिरी खपवून घेणार नाही. मात्र “मी” आजही पक्षाशी प्रामाणिक राहिलो. त्यामुळे मला जाण्यासाठी कोणी भाग पाडू नये, असा टोला त्यांनी लगावला. तर सद्यस्थितीत घर जळत आहे. त्यामुळे पहिली आग विझवण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य आमदाराचे सुध्दा हेच मत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री. केसरकर यांना काल मुंबई येथे शिवसैनिकांकडुन रोखण्याचा प्रयत्न झाला होता. या पार्श्वभूमीवर ते एका खासगी वाहीनीशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, काल झालेला प्रकार हा माझ्या सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला वेदना देणारा आहे. त्या ठिकाणी माझ्या घरातील काही अडचणी असल्यामुळे मला हॉटेलमध्ये राहणे शक्य नाही, असे सांगून मी घरी जात होतो. मात्र त्यावेळी हॉटेलच्या बाहेर असलेल्या शिवसैनिकांनी मला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु मी त्यांचे ऐकुन घेतले नाही. यावेळी शिवसेना वाढविण्यासाठी कोकणात माझा मोठा वाटा आहे, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर चौधरींनी मध्यस्थी केल्यानंतर मी निघून गेलो. आजही माझ्या घराच्या परिसरात शिवसैनिक आहेत. परंतु काही प्रकार झाला तरी मी घाबरून जाणार नाही. मी कायम दहशतवादाच्या विरोधात लढलो. मला जायचे असले असते, तर मी कधीही जावू शकतो. परंतु या ठिकाणी आपण भाजपासोबत जावूया, अशी मागणी आहे. त्यामुळे जाण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र कोणी त्यासाठी मला भाग पाडू नये, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, आपण यापुर्वीच भाजपासोबत जावूया, असे अनेक वेळा पक्षप्रमुखांना सांगितले होते. परंतु त्यांच्याकडुन योग्य तो निर्णय झाला नाही. शिंदेंसह अन्य आमदारांचे सुध्दा तेच मत आहे. राज्य चालवायच आहे. त्यामुळे काय करावे हा निर्णय त्यांनीच आता घ्यायचा आहे, असे विधानही त्यांनी यावेळी केले.

अभिप्राय द्या..