प्राथमिक शिक्षक भारती या तारखेला छेडणार धरणे आंदोलन.!

प्राथमिक शिक्षक भारती या तारखेला छेडणार धरणे आंदोलन.!

मसुरे /-

आंतरजिल्हा बदली झालेल्या १०३ प्राथमिक शिक्षकांना वेळीच कार्यमुक्त न केल्यास त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या सेवा ज्येष्ठतेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच या जिल्ह्यातील शिक्षकांच्या समायोजना साठीच्या जागाही अडून राहिल्या आहेत. या शिक्षकांना कार्य मुक्त केल्यास हे प्रश्न मार्गी लागणार असल्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान या शिक्षकांना कार्यमुक्त न केल्यास ५ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर याना निवेदन देत दिला आहे.
शासनाच्या ऑनलाईन बदली धोरणानुसार २०१९ पर्यंत पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या अशा एकूण तीन टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०३ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.
या शिक्षकांना वेळीच कार्यमुक्त न केल्यास ते ज्या जिल्ह्यात बदलीने जाणार आहेत त्या ठिकाणी त्यांच्या सेवाज्येष्ठता प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच या शिक्षकांना कार्यमुक्त केल्याने त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांवर जिल्ह्यातील शिक्षकांना सोयीची शाळा मिळून समायोजनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
त्यामुळे पहिल्या तीन टप्प्यात बदली झालेल्या १०३ आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात यावेत अन्यथा पाच ऑक्टोबर रोजी जि. प. भवनासमोर सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत कोविड नियमांचे पालन करून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल येईल. असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, सचिव अरुण पवार, सचिन डोळस, राकेश अहिरे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..