You are currently viewing मठ गावात अशीही सामाजिक बांधिलकी.;गरीब रुग्णास मदत.

मठ गावात अशीही सामाजिक बांधिलकी.;गरीब रुग्णास मदत.

वेंगुर्ला / –

वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील एका क्रिकेट स्पर्धा आयोजकांनी व विजेत्या व उपविजेत्या संघानी काही रक्कम त्याच गावातील एका गरीब रुग्णास देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे.मठ टाकयेवाडी येथील गितेश गावडे या जिल्हयात एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू म्हणून प्रसिध्द असलेल्या खेळाडूचे गतवर्षी अपघाती निधन झाले होते. त्याच्या स्मरणार्थ मठ गावातील गितेश गावडे मित्र  परिवारातर्फे एक गाव एक संघ खुली गितेश प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.तीन दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेचा सर्व खर्च भागवून उर्वरित राहिलेली रक्कम आपण मठ सतयेवाडी येथील आजारी तरुण तृषार प्रमोद गावडे यांना देऊया, अशी संकल्पना गितेश प्रिमियर लिगचे अध्यक्ष व युवा कार्यकर्ते समिर नाईक यांना सुचली. त्यांनी ती आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनाही पटली. त्याप्रमाणे तृषार गावडे यांना मदत करण्याचे ठरले. ही संकल्पना या स्पर्धेतील विजेत्या व उपविजत्या संघानाही सांगण्यात आली. त्यांनीही आपल्या बक्षिस रकमेतील काही पैसे मदत करण्याचे मान्य केले. त्यानुसार आयोजकांनी जमा झालेल्या पूर्ण रकमेपैकी १० हजार व या स्पर्धेतील विजेता संघ येसू आका परुळे संघाने त्यांना मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या रकमेपैकी ३ हजार रुपये, उपविजेत्या मानसीश्वर संघ उभादांडाने त्यांना मिळालेल्या रकमेपैकी २५०० रुपये तुषार गावडे या गरीब रुग्णासाठी दिले.सदर १५,५०० रुपये प्रीमियर लीग अध्यक्ष समिर नाईक यांच्या हस्ते तुषार गावडे याचे वडील प्रमोद गावडे यांच्याकडे  देण्यात आले.या प्रसंगी मठ ग्रामपंचायतचे माजी सरपंच किशोर पोतदार, सामाजिक कार्यकर्ते युवराज ठाकूर, तेजस बोवलेकर, समिर बोवलेकर, मिलिंद कोकरे, ओंकार बोवलेकर, संतोष कोकरे, प्रशांत नाईक, सुधीर राणे आदी उपस्थित होते. याबद्दल गीतेश गावडे प्रिमियर लिगचे अध्यक्ष समिर नाईक व त्यांच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा