You are currently viewing पंतप्रधानांकडून लसीकरणाबाबत मोठ्या घोषणा,महाराष्ट्राचं नियोजन कसं?आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

पंतप्रधानांकडून लसीकरणाबाबत मोठ्या घोषणा,महाराष्ट्राचं नियोजन कसं?आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

मुंबई /-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा केली.यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासह बूस्टर डोस संबंधीदेखील माहिती दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे.

राज्यात योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येईल टोपे

15 ते 18 वर्षाच्या वयोगटातील मुलांचे लसीकरण तसेच बूस्टर डोस साठी पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केलं आहे. 19 नोव्हेंबरपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने आपण केंद्रीय आरोग्य मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली होती.पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेची खरी गरज होती. दरम्यान लसीकरणाचे राज्यात योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येईल. याशिवाय सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचं देखील टोपे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले..

बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळातदेखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच, असे मुख्यमंत्री म्हणाले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील 7 डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती. याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांनादेखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनादेखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंतप्रधानांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. लसीकरणाबाबत आपण प्रगती करत आहोत. पंतप्रधानांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील (15 to 18 मुलांचं लसीकरण सुरू करणार. दुसरी घोषणा म्हणजे आरोग्य कर्मचारी अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दोन लसीकरणांनंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचं मोदींनी सांगितलं. तिसरी घोषणा म्हणजे 60 वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची सुरुवात करणार असल्याचं यावेळी मोदींनी सांगितलं.

अभिप्राय द्या..