मुंबई /-

ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने फैलावण्याची शक्यता आणि राज्यातील रुग्णसंख्येमध्ये सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता १५ जानेवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीमध्ये कोरोना संसर्गाचा फैलाव कशाप्रकारे होतो याकडे वैद्यकीय तज्ज्ञांचे लक्ष असणार आहे. या कालावधीमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच कोरोना साथसंसर्गाच्या अभ्यासकांनी काही ठरावीक भागामध्ये रुग्णसंख्येचा जोर वाढता असेल याकडे लक्ष वेधले आहे. या कालावधीमध्ये विषाणूचे वर्तन कसे आहे यावर संसर्ग फैलावण्याची शक्यता निर्धारित आहे. ज्या देशामध्ये ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार झाला आहे तिथे गर्दी असलेल्या, दाटीवाटीच्या लोकसंख्येमध्ये रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक दिसून येते.

भारतात समूहामध्ये कोणत्या प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक आहे, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आरटी-पीसीआर चाचण्या वाढवण्यासह जिनोम चाचण्यांची गती वाढवणे गरजेचे आहे. डेल्टाची जागा घेण्याची क्षमता ओमायक्रॉनमध्ये असली तरीही या विषाणू संसर्गामुळे आजाराची तीव्रता किती आहे, हे किती रुग्ण या कालावधीमध्ये आयसीयूमध्ये दाखल होतात यावर अवलंबून आहे. ज्या देशांमध्ये आज ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार झाला आहे, त्या देशातील रुग्णसंख्या कमीही होत आहे. आपण या देशांच्या तीन ते चार आठवडे मागे आहोत. इंग्लंड, दक्षिण अफ्रिका या देशामध्ये नैसर्गिक संसर्ग तसेच लसीकरण यामुळे समूह प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे दिसून येते. लसीकरणामुळे आपल्याकडेही हाच टप्पा येऊ शकतो, असे डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले. मात्र या विषाणूचे वर्तन भारतात तीव्र स्वरूपाचे नसेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आताही मुंबईमध्ये आढळणारे रुग्ण अधिक असले तरीही मृत्यूंची संख्या सहाव्यांदा शून्य नोंदवली गेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. टेस्ट पॉझिटिव्ह रेट हा १.५पेक्षा थोडा अधिक आहे. हा दर पाच ते दहा टक्क्यांवर जाईपर्यंत संसर्गाचा वेगाने फैलाव झाल्याचे निश्चित निदान होत नाही. समूहामध्ये डेल्टा विषाणूचा संसर्ग अधिक आहे, त्यामुळे जिनोम चाचण्यांची संख्या त्वरित वाढवून समूहात कोणत्या प्रकारच्या संसर्गाचा फैलाव अधिक आहे याचा अभ्यास सातत्याने करण्याची गरज टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केली.

विवाह सोहळे, गर्दी होणारे सणसमारंभ, स्नेहसंमेलने यामुळे रुग्णसंख्या वाढते. लस घेणे, दुहेरी मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे हे उपाय कटाक्षाने पाळावेत, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page