You are currently viewing मालवणच्या पंचायत समिती मध्ये ठरावाच्या विषयावरून उपसभापती- गटविकास अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक…

मालवणच्या पंचायत समिती मध्ये ठरावाच्या विषयावरून उपसभापती- गटविकास अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक…

मालवण /-

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतंर्गत काम झालेल्या तालुक्यातील चिंदर-त्रिंबक, आचरा हिर्लेवाडी- भंडारवाडी रस्त्यावरील खड्डे तसेच झाडी तोडण्याच्या कार्यवाहीबाबतच्या विषयावर ठराव घेण्यावरून उपसभापती राजू परुळेकर व गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक उडाली.अखेर संबंधित रस्ते अत्यंत नादुरूस्त असून या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच पाच वर्ष त्या रस्त्याची देखभाल दुरूस्ती ही संबंधित ठेकेदाराने करणे गरजेचे असून संबंधित विभागाने आपल्या अधिकारात संबंधित ठेकेदाराकडून हे काम करून घ्यावे असा ठराव यावेळी करण्यात आला.

मालवण पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, अशोक बागवे, गायत्री ठाकूर, मनीषा वराडकर, सोनाली कोदे, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतंर्गत झालेल्या चिंदर-त्रिंबक तसेच आचरा हिर्लेवाडी-भंडारवाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असून गेल्या काही सभांमध्ये याबाबत आवाज उठवूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही असे सांगत पंचायत समिती सदस्य अशोक बागवे, निधी मुणगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पाच वर्षे संबंधित रस्त्याची देखभाल दुरूस्ती करण्याचे काम संबंधित ठेकेदाराने करायचे आहे. मात्र गेल्या पाच वर्षात याची कार्यवाही झाली नसल्याचे सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर आक्रमक बनलेल्या उपसभापती राजू परुळेकर यांनी संंबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरत संबंधित ठेकेदाराच्या अनामत रकमेतून ही कामे करून घ्या तसा ठराव घ्यावा अशा प्रशासनास सूचना केल्या. यावर गटविकास अधिकार्‍यांनी अनामत रकमेबाबतचा ठराव घेता येणार नाही असे सांगितल्याने या विषयावरून उपसभापती परुळेकर व गटविकास अधिकारी जाधव यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक उडाली. ठराव घेता येणार नाही असे तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? सदस्य सातत्याने हा विषय मांडत असतील तर गेल्या तीन चार वर्षात संबंधित विभागाने खड्डे तसेच झाडी तोडण्याची कार्यवाही करणे गरजेचे होते ती त्यांनी का केली नाही असे सांगत श्री. परुळेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला.वाद वाढत असल्याचे लक्षात येताच सभापतींनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर या रस्त्यांच्या कामाची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच संबंधित ठेकेदाराकडून ही कामे करून घेण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. ठेकेदार जर काम करत नसेल तर त्याच्यावर संबंधित विभागाने कारवाई करावी अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.

तारकर्ली खाडीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणार्‍या नौकांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून दिले. त्यानंतर महसूल विभागाने कारवाई केली मग यापूर्वी कारवाई करण्यास महसूल प्रशासन झोपले होते का? ग्रामस्थ पकडून देणार तेव्हाच महसूल प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्‍न मधुरा चोपडेकर यांनी उपस्थित करत महसूलच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. पर्यटन हंगाम सुरू झाला असताना वीज पुरवठ्याची सुविधेत खंड पडू नये यासाठी तारकर्ली, देवबाग, वायरी भुतनाथ या गावांमध्ये रात्रीच्यावेळी वीज कर्मचारी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी चोपडेकर यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांकडे केली.

तालुक्यातील कांदळगाव, तारकर्ली, देवबाग गावात अज्ञातांनी खड्डेमय रस्त्यांप्रश्‍नी लावलेल्या बॅनरचा विषयही आजच्या मासिक सभेत गाजला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच सर्वसामान्यांचे हाल होत असून त्यांनी आपली नाराजी या बॅनरमधून व्यक्त केली असल्याचे अशोक बागवे यांनी सांगितले. तालुक्यातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न करावेत अशी मागणीही त्यांनी केली.

अभिप्राय द्या..