You are currently viewing मालवण तालुक्यातील रेवंडी-कोळंब येथील बिबट्याच्या हल्ल्यात म्हैस जखमी नागरिकांनमद्धे भीतीचे वातवरण..

मालवण तालुक्यातील रेवंडी-कोळंब येथील बिबट्याच्या हल्ल्यात म्हैस जखमी नागरिकांनमद्धे भीतीचे वातवरण..

मालवण /-

रेवंडी-कोळंब परिसरात गेले काही दिवस बिबट्यांच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल या बिबट्यांनी एका म्हशीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. यात वनविभागाने केवळ ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी एक फलक लावण्यापलिकडे या बिबट्यांना पकडण्यासाठी कोणतीही कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेले काही दिवस रेवंडी-कोळंब परिसरात दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्यावेळी नर, मादी बिबट्या व त्यांची दोन बछडे यांचा वावर वाढला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या बिबट्यांना पाहिले आहे. काल स्थानिक ग्रामस्थांनी चरण्यासाठी सोडलेल्या एका म्हशीवर या बिबट्यांनी हल्ला केला यात ती म्हैस गंभीर जखमी झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आज झालेल्या पंचायत समितीच्या सभेत माजी सभापती सोनाली कोदे यांनी बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असल्याचे निदर्शनास आणून दिले.

रेवंडी-कोळंब यातील बराचसा भाग हा जंगलमय असून काही भागात लोकवस्तीही आहे. बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे या लोकवस्तीतील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून त्यांच्या तसेच पाळीव जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागास याची माहिती दिली आहे. यात वनविभागाने केवळ फलक लावण्याचे काम केले आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची कोणतीही कार्यवाही न केल्याने सौ. कोदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बिबट्यांमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या तसेच पाळीव प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याने याकडे लक्ष देत वनविभागाने तत्काळ या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे.

अभिप्राय द्या..