You are currently viewing पोलीस अधीक्षक दाभाडेंनी वैभववाडी पोलिसांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप…

पोलीस अधीक्षक दाभाडेंनी वैभववाडी पोलिसांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप…

वैभववाडी /-

२३ लाखाच्या लुटीचा बनाव करणाऱ्यांचा वैभववाडी पोलिसांनी २४ तासांत पर्दाफाश केला. वैभववाडी पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक करत पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडेंनी पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.

सेक्युअर व्हल्यु इंडिया कंपनी लि. ही कंपनी जिल्ह्यातील बॕंकांच्या एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम सन २०१५ पासून जिल्ह्यात करीत आहे. या कंपनीचे कर्मचारी विठ्ठल खरात रा. वेंगुर्ला व सगुण केरवडेकर रा. कुडाळ ये दोघजण गेली पाच सहा वर्षे कंपनीत काम करीत आहेत. मंगळवारी कणकवली येथील बॕंक आॕफ इंडीया शाखेतून एटीएम मशिनमध्ये भरण्यासाठी त्यांनी ३० लाख रुपये काढले. त्यातील ७ लाख रुपये येथीलच एटीएम मशिनमध्ये भरले व उर्वरित २३ लाख रुपये घेऊन मोटारसायकलने ते वैभववाडी येथील एटीएम मशिनमध्ये भरण्यासाठी येत होते. दरम्यान तळेरे वैभववाडी महामार्गावर कोकिसरे घंगाळवाडीनजीक मागून मोटारसायकलवरुन आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मोटारसायकलला लाथ मारली. यात हे दोन्हीही कर्मचारी रस्त्याच्या कडेला पडले. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावाडर टाकून त्यांकडे असलेली २३ लाख रुपये असलेली बॕग हिसकावून घेऊन तळेरेच्या दिशेने पोबारा केला, अशी फिर्याद या कर्मचाऱ्यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत दिली होती.

पोलीस निरीक्षक अतुल जाधव व पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोऊनि सुरज पाटील, पोलीस नाईक अभिजित तावडे यांनी यांनी विठ्ठल जानू खरात, रा. वायंगणी याच्याकडे गुन्ह्याचे अनुशंगाने चौकशी केली असता त्याने आपण व फिर्यादी सगुण मनोहर केरवडेकर यांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे मान्य केले व गुन्हा उघडकीस आणला. ही लुटीची रक्कम रु. २३ लाख त्यांचा मित्र लाडू उर्फ निखिल वेंगुर्लेकर वय ३० रा. कोचरे वेंगुर्ला सध्या राहणार एमआयडीसी कुडाळ याच्या ताब्यात दिल्याचे व त्यानंतर त्याने ही रक्कम किरण प्रभाकर गावडे वय ३२ रा. नेरूर, वाघाचीवाडी, कुडाळ याच्या ताब्यात दिल्याचे मान्य केले. त्यानंतर ही रक्कम व गुन्ह्यात वापरलेली वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आणि या गुन्ह्यातील सर्व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.

तपासादरम्यान वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अभिजित तावडे, पोलीस नाईक मारूती साखरे, पोलीस नाईक रमेश नारनवर पोकॉ/ संतोष शिंदे, पोकॉ अजय बिल्पे, पोको पडवळ, चालक झूजे फर्नांडीस यांनी मोलाची भूमीका बजावली आणि हा गुन्हा मोठ्या शिताफीने उघडकीस आणला. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी 19 ऑक्टोबर रोजी वैभववाडी पोलीस ठाणे येथे भेट देवून सर्व तपास टिमचे कौतुक केले. तसेच त्यांचा सत्कार केला आणि भविष्यातही अशाच प्रकारे काम करण्याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या.

अभिप्राय द्या..