You are currently viewing यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा.;‘फार्मसीस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार मकरंद कशाळीकर यांना प्रदान..

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा.;‘फार्मसीस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार मकरंद कशाळीकर यांना प्रदान..


सावंतवाडी/ –

आजच्या काळात फार्मसिस्ट आणि सामान्य रुग्ण यांच्यामध्ये विश्वासाचे नाते तयार होणे अत्यन्त आवश्यक आहे, पेशंट कौन्सिलिंग हे कम्युनिटी फार्मासिस्टचे प्रमुख कर्तव्य आहे असे प्रतिपादन मकरंद कशाळीकर यांनी केले. जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधून यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या वतीने कशाळीकर यांचा फार्मसिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मसी दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई, जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आनंद रासम, तालुकाध्यक्ष विनायक दळवी, तालुका सचिव संतोष राणे, भोसले नॉलेज सिटीच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे रजिस्ट्रार प्रसाद महाले, जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ.जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात फार्मसी क्षेत्राचे महत्त्व व कॉलेजची एकंदर वाटचाल विषद केली. प्रा.साठे यांनी फार्मसिस्ट दिनाचा इतिहास व देशाचे जगाच्या औषध निर्मितीतील स्थान यासंबंधीची माहिती दिली. विनायक दळवी यांनी फार्मासिस्ट हे ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देताना कशाप्रकारे जोखीम पत्करतात, रात्री-अपरात्री आपली सेवा बजावतात तसेच फार्मासिस्ट आपल्या दारी ही संकल्पना जनतेसाठी किती उपयोगी ठरली याविषयी आपले विचार मांडले. आनंद रासम यांनी कोव्हीड काळात अविरत अखंड सेवा बजावलेल्या फार्मासिस्ट वर्गाचे विशेष कौतुक केले. आरोग्य व्यवस्थेतील इतर कर्मचाऱ्यांसोबतच फार्मसिस्ट वर्गानेही अत्यंत मोलाचे योगदान दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी शिक्षणावरच न थांबता फार्मसी क्षेत्रातील पदव्युत्तर व डॉक्टरेट पर्यंतचे शिक्षण घ्यावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
एक जबाबदार फार्मासिस्ट या नात्याने समाजामध्ये विशेष सेवा बजावलेल्या व्यक्तीचा दरवर्षी कॉलेजतर्फे ‘फार्मसिस्ट ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. गेली 32 वर्षे सचोटीने व्यवसाय करत असलेल्या कशाळीकर मेडिकल स्टोअर्सचे मालक मकरंद श्रीपाद कशाळीकर यांना हा पुरस्कार संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी शिल्पा कशाळीकर, मुलगी तन्वी कशाळीकर व मुलगा वेदांग कशाळीकर उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देताना पेशंटशी सुसंवाद व पेशंट कौन्सिलिंग हे सूत्र आपणाला खूप मोलाचे ठरले असल्याचे कशाळीकर म्हणाले. आपण प्रामाणिकपणे केलेल्या व्यवसायाची पोचपावती म्हणजेच आपल्याला मिळालेला आजचा हा पुरस्कार होय. आपल्या या यशामध्ये सर्व कशाळीकर कुटुंबीय, आपल्याला घडवणारे गुरुजनवर्ग, विश्वासाने जोडला गेलेला प्रत्येक सर्वसामान्य रुग्ण, व्यवसायातील इतर कर्मचारी तसेच रिटेल व होलसेल व्यवसायातील सर्व सहकारी यांचा मोलाचा वाटा असल्याचे ते म्हणाले.
संजीव देसाई म्हणाले की फार्मासिस्ट वर्ग हा सामाजिक आरोग्य व्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे. त्यांच्या कार्याची योग्य दखल घेता यावी यासाठीच संस्थेने सात वर्षांपूर्वी हा पुरस्कार जाहीर केला. या मधून विद्यार्थ्यांनाही एक प्रकारची प्रेरणा मिळेल व भविष्यात ते देखील आदर्श फार्मसिस्ट बनतील.
कॉलेजच्या ई-मॅगझीन व ई-माहिती पुस्तिकेचे उदघाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला केमिस्ट प्रतिनिधी स्टीवन डिसिल्वा, ग्रेगरी डान्टस, सतीश पडते, प्रसाद सप्ते, दीपक गावकर आदी उपस्थित होते. विद्यार्थी वर्ग ऑनलाईन झूम प्रक्षेपणाद्वारे कार्यक्रमात सहभागी झाला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.हर्षदा साईल यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.तुषार रुकारी यांनी केले.

अभिप्राय द्या..