You are currently viewing “सेल्फी विथ रुग्णवाहिका” हा कार्यक्रम लवकरात लवकर आटोपून रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत रुजू कराव्यात<br>जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई

“सेल्फी विथ रुग्णवाहिका” हा कार्यक्रम लवकरात लवकर आटोपून रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत रुजू कराव्यात
जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई

कुडाळ /-

संपूर्ण राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका पुरवणे हे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या रुग्णवाहिका निर्लेखित झालेल्या होत्या किंवा नादुरुस्त होत्या त्या ठिकाणी राज्य शासनाने नवीन रुग्णवाहिका दिल्या त्याबद्दल त्यांचे आभारच आहेत. मात्र गेल्यावेळी सारख्या केवळ फोटोसेशन करण्याकरता या रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत रुजू होण्यास विलंब झाला तर खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देखील जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई यांनी दिला आहे. ज्यांना कोणाला या रुग्णवाहिका सोबत फोटोसेशन करायचे असेल त्यांनी ते तातडीने करून घ्यावे. गरज पडल्यास आम्ही फोटोग्राफर देखील पुरवू परंतु केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोणीही या रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत देण्यास विलंब केला करू नये असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. मागच्या वेळी देखील राज्य शासनामार्फत व जिल्ह्यातील खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर झालेल्या रुग्णवाहिकांची लोकार्पण करण्याकरता आठ दिवस वाया घालवले होते व कोरोनाच्या कालावधीमध्ये केवळ फोटोसेशन करून प्रसिद्धी मिळवण्याकरता लोकांच्या जीवाशी सत्ताधाऱ्यांनी खेळ केला होता. त्यामुळे यावेळी ज्यांना रुग्णवाहिकांसोबत फोटोसेशन करायचे असेल किंवा स्वतःचे सेल्फी काढायचे असतील त्यांनी ते तातडीने काढून रुग्णवाहिकांचा मार्ग मोकळा करून द्यावा असा टोमणा देखील त्यांनी लगावला आहे. आपल्या जिल्ह्यात रुग्णवाहिका मिळाल्या ही आनंदाचीच गोष्ट आहे मात्र आता या जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत ज्या असुविधा आहेत त्या देखील लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. सध्या देण्यात आलेल्या रुग्णवाहिका या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण व डोंगरी भागासाठी उपयुक्त नाहीत. केवळ घाटमाथ्यावरील सपाट रस्त्यावरून या रुग्णवाहिका व्यवस्थित चालू शकतात व चढउतार असलेल्या आपल्या या जिल्ह्यात या रुग्णवाहिका जास्त उपयोगी पडणार नाहीत. तसेच या रुग्णवाहिकांचे डिझेल ॲव्हरेज देखील सात किलोमीटर प्रति लिटर आहे. म्हणजेच एका किलोमीटरला साधारण चौदा रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यात डोंगरी विभागाचे निकष लक्षात घेता भविष्यात देण्यात येणाऱ्या रुग्णवाहिका वेगळ्या कंपनीच्या असाव्यात असा ठराव देखील जिल्हा परिषद ने राज्य शासनाकडे करून पाठवला होता. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यातील रुग्णवाहिका वाहनचालकांचे वेतन देखील वेळेवर मिळत नाही तर डिझेल साठी लागणारी रक्कम कुठून मिळणार हा देखील एक मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे या रुग्णवाहिकांची श्रेय घेणाऱ्यांनी यामध्ये असलेल्या त्रुटींचे देखील श्रेय घ्यायला संकोच करू नये असा उपरोधिक टोला येथील रणजित देसाई यांनी लगावला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा