You are currently viewing जिल्ह्यात ‘ नवं ‘ कापणीला उत्साहात सुरुवात..

जिल्ह्यात ‘ नवं ‘ कापणीला उत्साहात सुरुवात..

सावंतवाडी /-

गणेशोत्सवात कोकणात ‘नवं’ करण्याची परंपरा आजही कायम आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी नवं केल जात. सावंतवाडी तालुक्यातील संस्थानकालीन ओटवणे गावात या परंपरेला साडेचारशे वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. आगळ्यावेगळ्या पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. भाताच्या लोंब्या काही प्रमाणात तयार झाल्या की प्रथेप्रमाणे या गावात ‘नवं’ करण्यात येत. संस्थानकाळापासून पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या नवं कापणीला ओटवणेत सुरुवात करण्यात आली. शेतात तयार झालेले भात एकत्रितरित्या कापणी करून त्याची तोरणे बनवून दरवाजाला लावली जातात. यानंतरच भात कापणीला सुरुवात केली जाते. परंपरागत चालत आलेल्या नव कापणीची परंपरा आजही ओटवणे येथे ब्राह्मण, देवस्थानचे मानकरी यांच्या साक्षीने सांभाळली जाते. यामुळेच भात लागवडीस चांगले उत्पादन मिळते, अशी लोकांची श्रद्धा आहे. यंदा कोव्हिड नियमावलीचे पालन करत हा उत्सव साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी शेतात काबाडकष्ट करून पिकविलेले धान्य पदरी पडण्यासाठी नवं साजर केलं जातं. यावेळी शेतकऱ्यांच्या पदरी भरघोस पीक पडू देण्यासाठी निसर्गासह ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घातलं जात. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ओटवणेत कुळघराकडे सकाळीच दवंडी देण्यात येते, कुळघराकडे सर्वजण आल्यानंतर सवाद्य नवे साजरे करण्याच्या ठिकाणी ग्रामस्थ जातात. नव्यासाठी ओटवणे मांडवफातरवाडीतील भिवा म्हापसेकर यांच्या भात पिकाची निवड यावर्षी करण्यात आली. पुरोहिताच्या मंत्रोच्चारात भात पिकाची विधिवत पूजा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा