You are currently viewing खारेपाटण रोड-चिंचवली रेल्वे स्टेशन अखेर प्रवाशांच्या सेवेत..

खारेपाटण रोड-चिंचवली रेल्वे स्टेशन अखेर प्रवाशांच्या सेवेत..

संघर्ष समिती करणार पहिल्या रेल्वेचे मोठया उत्साहात स्वागत ; सूर्यकांत भालेकर..

खारेपाटण /-

सिंधुदुर्ग जिह्याच्या प्रवेशद्वारावर असलेले, खारेपाटण दशक्रोशातील नागरिकांची गेली अनेक वर्षांपासूनची मागणी असलेले व सध्या पूर्णत्वास गेलेले कोकण रेल्वेचे बहुप्रतिक्षित असे चिंचवली येथील खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन अखेरीस प्रवाशांच्या सेवेत रुजू झाले आहे. दिनांक ७ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ठीक १०.०४ वाजता गणपती स्पेशल दादर सावंतवाडी पॅसेंजर ही पहिली गाडी या स्टेशनवर प्रथमच थांबणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समितीला लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे या रेल्वेचे मोठ्या उत्साहात संघर्ष समिती मार्फत विविध मान्यवरांच्या उपस्थित स्वागत करण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर यांनी सांगितले.

या स्वागत समारंभासाठी आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद माजी सभापती व सदस्य बाळा जठार, पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे, संघर्ष समितीचे अध्यक्ष नासिरभाई काझी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री. भालेकर यांनी दिली आहे.

खारेपाटण दशक्रोशीसाठी चिंचवली येथे रेल्वे स्टेशन व्हावे, अशी येथील जनतेची खूप वर्षांपासूनची मागणी होती. रेल्वे स्टेशन संघर्ष समितीमार्फत मोठे जनआंदोलन उभे करण्यात आले. या आंदोलनाची तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री कोकण सुपुत्र सुरेश प्रभू यांनी दखल घेऊन या स्टेशनला तात्काळ मंजुरी दिली होती. आज हे स्टेशन प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असल्याने खारेपाटण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या स्वागत समारंभासाठी खारेपाटण परिसरातील ग्रामस्थांनी मंगळवार दि. ७ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संघर्ष समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा