राज्यात ४ हजार ४५६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद;१८६ जणांचा कोरोना मुळे मृत्यू..

राज्यात ४ हजार ४५६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद;१८६ जणांचा कोरोना मुळे मृत्यू..

मुंबई /-

राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. राज्य सरकारकडून निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी रूग्ण संख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाउनचा इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे सातत्याने आवाहन केले जात आहे. दरम्यान, आज राज्यात दिवसभरात ४ हजार ४५६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर आज १८६ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

तर, दुसऱ्या बाजूला कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज ४ हजार ४३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ७७ हजार २३० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यात २ लाख ९० हजार ४२७ व्यक्ती होमक्कारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ०७१ व्यक्ती संस्थात्मक क्कारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५१ हजार ०७८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४ लाख ६९ हजार ३३२ झाली आहे.

मुंबईत आज ४१६ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत ३ हजार १८७ रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत टास्क फोर्सची वैद्यकिय परिषद

कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेक विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार, असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत.

रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे.

अभिप्राय द्या..