You are currently viewing गणेशोत्सवातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगराध्यक्ष नलावडे यांचा अॕक्शन प्लॕन तयार..

गणेशोत्सवातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगराध्यक्ष नलावडे यांचा अॕक्शन प्लॕन तयार..

फ्लाय ओव्हर ब्रीज खाली भरणार भाजी मार्केट.;डीपी रोड, बाजारपेठेत रस्त्यावर बसल्यास विक्रेत्यांवर होणार कारवाई..

कणकवली /-

कोकणवासियांचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरात वाहतूक कोंडी उद्भवू नये व जनतेला योग्य प्रकारे शहरात सुविधा मिळावी या दृष्टीने कणकवली नगरपंचायत कडून गणेशोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात डीपी रोडवर भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तसेच कणकवली पटवर्धन चौक ते ढालकाठी पर्यंतच्या रस्त्यावर नो हॉकर्स झोन राहणार आहेत. त्याचबरोबर फ्लाय ओव्हर ब्रिज खालील मोकळ्या जागेत भाजी, फळ, फूल कपडे व स्टेशनरी, कटलरी साहित्य विक्रेत्यांना नंबरींग करून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसारच या विक्रेत्यांनी आपली दुकाने लावायची आहेत, अशा सूचना कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आजच्या विक्रेत्यांसोबतच्या बैठकीत दिल्या.

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या दालनात काल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजी, फळ, फुल व हातगाडी वरील विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी गणेशोत्सव कालावधीत जनतेला त्रास होऊ नये, या दृष्टीने नियोजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभिजीत मुसळे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक कन्हैया पारकर, महेश सावंत, अनिल हळदिवे, सतीश कांबळे, पांडू वर्दम, राजा पाटकर, भाजी, फळ, फुल, हातगाडी विक्रेते आदी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने स्टेट बँक ते सह्याद्री हॉटेल पर्यंतच्या फ्लाय ओव्हर ब्रिज खाली मोकळ्या जागेत फळ, भाजी, फुले विक्रेते, रिक्षा, सहा सीटर यांना गणेशोत्सव कालावधीत थांबविण्याकरीता जागा करून देण्याचे निश्चित करण्यात आले. यात स्टेट बँक समोरील भागात टेम्पो, अभ्युदय बँकेचे समोरील भागात रिक्षा तर पटवर्धन चौकात लागून असलेल्या भागात गणेशोत्सव कालावधीत लागणारे गावठी साहित्य विक्री करता आणणाऱ्या विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा निश्चित करून देण्यात येणार आहे. तर लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्सच्या समोरील भागात जे ब्रिजचे २ गाळे आहेत, तेथे फळ, फुले व भाजीविक्रेते यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच ठिकाणी एका बाजूला लहान किरकोळ भाजी विक्रेते आहेत, त्यांना जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यापुढे कटलरी साहित्य व कपडे व्यवसायिकांना जागा देण्यात येणार आहे. तर पेट्रोल पंपाच्या समोरील भागात सहा सीटर रिक्षा चालकांना जागा देण्यात येणार आहे. बाजूला सहा सीटर व उर्वरित भागात दुचाकी पार्किंगसाठी जागा तयार करण्यात येणार आहे, असे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी सांगितले.

यावेळी कन्हैया पारकर यांनी जागा नेमून देत असताना प्रत्येक विक्रेत्याची लिस्ट व मोबाईल नंबर घ्या व प्रत्येक जागेला नंबरींग करा, अशी सूचना केली. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनी ही सूचना मान्य करत त्यानुसार येत्या दोन दिवसात हे नंबरिंग पूर्ण करण्यात येईल व जागा आखून देण्यात येईल असे सांगितले. यावेळी विजच्या खाली जमिनीची लेव्हल करण्यात येईल व विक्रेत्यांना सुटसुटीत जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नगरपंचायत लवकरच नियोजन करेल, असेही स्पष्ट करण्यात आले. तसेच सर्विस रोडच्या लगत असलेल्या बॅरिकेट वरून थेट विक्रेत्यांकडून खरेदी विक्री होऊ नये याकरीता फ्लायओव्हरच्या विजच्या खाली या विक्रेत्यांना दिलेल्या जागी जाण्यासाठी इन आऊट असे मार्ग ठेवण्यात येतील. व बेरिकेटला लागूनच ग्रीन नेट लावण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना देखील खरेदीसाठी एकाच छताखाली भाजी फळे फुले मिळतील व सर्व्हिस रस्त्यावर होणारी गर्दी ही वाहतूक कोंडी देखील टाळता येईल असे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..