मुंबई /-

मीरा रोड – केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेकडे आज मीरा भाईंदर भाजपने सपशेल पाठ फिरवली. परंतु मराठा समाजाने मात्र काशीमीरा नाक्यावर राणे यांचे आपुलकीने स्वागत करून त्यांचा सत्कार केला.

भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची केंद्रीय उद्योगमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर, राज्यातील इतर केंद्रीय मंत्र्यांप्रमाणेच राणे यांनीसुद्धा जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे.यात्रेच्या माध्यमातून ठिकठिकाणी भेटीगाठी व जनसंपर्क साधून भाजपाची मोर्चेबांधणी सुरू आहे. आज शनिवारी राणे यांची जन आशीर्वाद यात्रा मीरा-भाईंदरमधून गेली. परंतु मीरा भाईंदर महापालिकेत सत्तारूढ असलेल्या भाजपाने मात्र राणे यांच्या यात्रेकडे सपशेल पाठ फिरवली.

पालिकेत महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती, परिवहन सभापती, महिला बाल कल्याण सभापतींसह भाजपाचे एकूण ६० नगरसेवक व समिती सदस्य आहेत. मात्र, तरीही कुणीही राणेंच्या जन आशिर्वाद यात्रेकडे फिरकले नाही. एवढेचन नाही, तर भाजपाचे पदाधिकारीही त्यांच्या जन आशिर्वाद यात्रेकडे गेले नाही. त्यामुळे पक्षाचा मोठा नेता तथा केंद्रीय मंत्री शहरात येऊनदेखील स्थानिक भाजपने राणेंकडे सपशेल पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे.यावेळी, सकल मराठा समाजाच्या वतीने मात्र राणे यांचे काशीमीरा नाक्यावर स्वागत व सत्कार करण्यात आला. विविध पक्षातील पदाधिकारीदेखील राजकीय मतभेद बाजूला ठेवून मराठा समाज म्हणून राणे यांच्या स्वागतासाठी एकत्र आले होते.यावेळी राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर राणे हे पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.

दरम्यान काशीमीरा पोलिसांनी , जमावबंदी व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मराठा समाजाच्या सुमारे ५० ते ६० उपस्थितांवर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page