मठ भागातील समस्यांकडे कोण लक्ष पुरविणार ?

मठ भागातील समस्यांकडे कोण लक्ष पुरविणार ?

वेंगुर्ला /-

मे महिन्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळात वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी मुख्य रस्त्यादुतर्फा असलेली मोठमोठी झाडे जमीनदोस्त झाली.अशाच प्रकारे मठ भागातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यांमुळे वटवृक्ष व अन्य झाडे मुख्य रस्त्यावर पडली होती.या ठिकाणची झाडे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तात्पुरती बाजूस करुन तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे.परंतु सध्या पावसाळ्यात ही झाडे गटारात तशीच ठेवल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे.पालापाचोळा गटारात साचल्याने दूषित पाणी रस्त्यावरुन वाहत आहे.परिणामी,अपघात होऊन जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे.मठ भागात याच मुख्य रस्त्यावर,ठाकूरवाडी वळणावर,मठकरवाडी तसेच
मठ ग्रामपंचायत नजीक गावठणवाडी भागात मुख्य रस्त्यावरुन दूषित पाणी वाहत असून येथील स्थानिकांसह अन्य ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असून साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता आहे.पावसाळी हंगामापूर्वी गटार उपसा करणे आवश्यक असताना नागरिकांच्या आरोग्याच्या व हिताच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीही दखल घेत नसल्याचे जाणवत आहे.संबंधित विभागाचे अधिकारी मात्र या गंभीर बाबीकडे कधी लक्ष पुरविणार ?असा संतप्त सवाल वाहनधारकातून व्यक्त होत आहे.याबाबत जनतेच्या हिताच्या दृष्टीने त्वरित पाहणी करुन “तात्पुरती मलमपट्टी” न करता योग्य उपाययोजना करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..