बॉम्बे ब्लडग्रुप रक्तगटाच्या पंकजने वाचविले महिलेचे प्राण..

बॉम्बे ब्लडग्रुप रक्तगटाच्या पंकजने वाचविले महिलेचे प्राण..

सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानच्या टिमने मानले मालवणचे सुपुत्र तथा बॉम्बे ब्लडग्रुपचे रक्तदाते पंकज गावडे यांचे आभार..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिवाळे-मालवण येथील लक्ष्मी नारायण गावडे या रुग्णाला हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्ताची गरज होती. रुग्णाची रक्त तपासणी केली असता रक्तचाचणी मध्ये रुग्णाचे रक्त ओ पोजीटीव्ह किंवा ओ निगेटिव्ह सुद्धा आढळत नव्हते. नंतर रक्तपेढीचे तंत्रज्ञ सुमित मुकादम, श्रध्दाली बिले आणि वरदा गाडगीळ या चमुने सदरच्या रक्तनमुन्याची सखोल तपासणी केली असता ही रुग्ण बॉम्बे रक्तगटाची असल्याचे निदर्शनास आले. बॉम्बे ब्लड ग्रुप हा अतिदुर्मिळ रक्तगट असुन या रक्तगटाचे दहा लाखांमध्ये ४ रक्तदाते सापडतात.

अशा परिस्थितीमध्ये अत्यावश्यक रक्ताची दुर्मिळता लक्षात घेवुन रुग्णाच्या नातेवाईकाना मानसिक दडपण येवु नये, म्हणुन SSPM लाईफटाईम हॉस्पिटलचे डॉक्टर बावणे यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सचिव किशोर नाचणोलकर आणि सहखजिनदार अमेय मडव यांच्याकडे आधी संपर्क साधला. त्यांनी तातडीने मालवणचे सुपुत्र तथा बॉम्बे ब्लडग्रुपचे रक्तदाते पंकज संतोष गावडे यांना संपर्क केला. पंकज गावडे हे देखील तात्काळ सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर आणि कुडाळ-वेंगुर्ला विभागीय संघटक आणि नियमित प्लेटलेट डोनर यशवंत गावडे यांच्यासोबत SSPM हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रक्ताच्या सर्व अत्यावश्यक तपासण्या झाल्यानंतर पंकज गावडे (मालवण) यांनी अमूल्य आणि सर्वात दुर्मीळ असे रक्तदान केले आणी त्यानंतर सदर रुग्णाची अन त्याच्या नातेवाईकांची सिंधु रक्तमित्रच्या टीमने प्रत्यक्ष भेट घेवुन त्याना सविस्तर माहीती देवुन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आपल्या सोबत असल्याचा धीर दिला.

यापुर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये पंकज गावडे यांचे बॉम्बे रक्तगटाचे रक्त विशाखापट्टणम येथे रवाना करून तेथील रुग्णाचे प्राण वाचविले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बॉम्बे ब्लडग्रुपच्या रूग्णाला देण्यात आलेले हे पाहिलेच रक्तदान जे रुग्णाला कुठेही न हलवता किंवा रक्तदात्याला जिल्ह्याबाहेरून न आणता यशस्वीरीत्या पंकज गावडे यांच्या रूपाने केले गेले. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर SSPM लाईफटाईम हॉस्पिटलचे डीन डॉ. आर. एस. कुलकर्णी, डॉ. गोपाल, डॉ. आविष्कार, रक्तपेढीचे डॉ. बावणे सर, कुडाळ-वेंगुर्ला विभागीय संघटक आणि नियमित प्लेटलेट डोनर यशवंत गावडे, रक्तपेढीचा स्टाफ आदि उपस्थित होते.

अभिप्राय द्या..