मालवण /-
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अद्यापही धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने माझे कुटुंब माझी जबाबदारीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचबरोबर व्यापारी संघटनेने स्वतःची मार्गदर्शक तत्त्वे ठरविणे गरजेचे आहे असे मत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकातून व्यक्त केले आहे.
शासनाच्या ब्रेक द चैन च्या पुढे जावून गेले सात दिवस शहर कडकडीत बंद ठेवत पालकमंत्र्यांच्या हाकेला नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शहरवासियांचे, व्यापार्यांचे आभार मानले आहेत. शहरात सध्या कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. त्यावर कडक लॉकडाऊन हा केलेला एक उपाय. मात्र अद्यापही धोका टळलेला नाही. गतवर्षी शहरात कोरोनाच्या ८ महिन्याच्या कालावधीत सुमारे २४० एवढे रुग्ण होते मात्र मागील दोन महिन्यात सुमारे ४७५एवढे रुग्ण आढळले आहे. दरदिवशी यात सरासरी २० रुग्ण वाढत आहेत. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असून ही बाब चिंताजनक आहे. आता उद्यापासून अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते अकरा यावेळेत सुरू राहणार आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता खरी काळजी घेण्याची गरज आहे. येणार्या पंधरा दिवसाच्या काळात हे कोरोनाचे संकट गेले पाहिजे यासाठी व्यापारी, नागरिकांनी संघटितपणे लढा देण्याची वेळ आहे. अन्यथा पुढील लॉकडाऊन झाल्यास जिथे रुग्ण जास्त तिथे लॉकडाऊन आणि जिथे रुग्णसंख्या कमी तिथे लॉकडाऊनमध्ये शिथिलता असा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अत्यावश्यक सेवा जोडून जे व्यवसाय बंद आहेत ते कसे लवकरात लवकर सुरू करता येतील. यादृष्टीने व्यापारी वर्गाने शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या पलिकडे जावून स्वतःची मार्गदर्शक तत्त्वे तयार करायला पाहिजेत. व्यापारी संघटनेने या नियोजनासाठी आपलीच एक कमिटी करायला हवी. आपला व्यापारी बंधू या कोरोनाच्या लढाईसाठी तयार केला पाहिजे. यासाठी पहिल्यांदा आपल्या व्यापारी वर्गाला शासनाच्या नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन केले पाहिजे. पालन न करणार्या व्यापार्यांवर दंडात्म कारवाई ठरविली पाहिजे. दररोज व्यापारी वर्गाची, त्यांच्या कामगारांची थर्मल गन, ऑक्सिमीटरने तपासणी करूनच दुकान सुरू करणे, स्वतःच्या कुटुंबाची पण तपासणी करून घेणे, लसीकरण करून घेण्याबाबत पाठपुरावा करणे, दुकानात येणारे नागरिक नियमांची पूर्तता करतात की नाही, न केल्यास त्यांचे प्रबोधन करणे, नियम न पाळणार्या नागरिकांस वस्तु न देणे यासारखे नियम करायला हवेत असेही नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी पुढील काही दिवस अनावश्यक न फिरणे, कमीत कमी गरजा ठेवणे, कोरोनाची लक्षणे दिसल्यास घरी उपचार न करता तत्काळ रुग्णालयात जात तपासणी करणे, पॉझिटिव्ह रुग्ण आल्यास त्या कुटुंबाने आपल्या संपर्कातील व्यक्तीची माहिती देणे, त्यांची स्वॅब तपासणी करून घेणे, कंटेन्मेंट झोन असल्यास १४ दिवस त्याचे प्रामाणिकपणे पालन करणे या गोष्टी स्वयंस्फूर्तीने केल्या पाहिजेत. कारण आरोग्य, महसूल, पोलिस, पालिका प्रशासन या संकटावर मात करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. जेणेकरून मालवणचे जनजीवन, व्यापार सुरळीत होईल. त्यांच्याही मानसिकतेचा विचार करण्याची गरज आहे. नसिकतेचा विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर आणि तरच आपण या आपत्तीवर नियंत्रण मिळवू शकतो. शासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला दंड करण्याची संधी न देण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया आणि मालवण शहर कोरोना मुक्त करूया असे आवाहनही श्री. कांदळगावकर यांनी केले आहे.