वेंगुर्ला /-


वेंगुर्ला तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीचे सरपंच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सर्व सरपंच आणि कोरोना नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्यां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वास्तविक गाव पातळीवर कोरोना रोखण्यासाठी या सर्वांचे अमूल्य असे योगदान लाभले आहे. परंतु शासकीय यंत्रणेने मात्र या सर्वांचा फक्त वापर करून घेतला आहे.
मागील १५ दिवसापूर्वी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे ग्राम स्तरावरील कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष असलेले सरपंच व त्या समितीच्या अशासकीय सदस्यांसाठी फ्रन्टलाइन वर्कर्स म्हणून लसीकरण करण्यासाठी पाठपुरावा करून तात्काळ लसीकरणाची व्यवस्था करण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले होते.
परंतु १५ दिवस उलटून गेले तरीही जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतलेली दिसून येत नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदार कोरोनावर नियंत्रण मिळाल्यावर स्वतःची पाठ थोपटून घेतात, पण ज्यांनी या साठी दिवस रात्र मेहनत घेतली त्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समितीला वाऱ्यावर सोडून दिले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच संघटनेने सरपंच, उपसरपंच आणि कोरोना नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्यांच्या विमा संरक्षण आणि लसीकरनासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. पण पालकमंत्री उदय सामंत यांनी मात्र आतापर्यंत विमा संरक्षण आणि लसीकरण करण्याचे गाजर दाखवण्याचे काम केले आहे.त्यामुळे येत्या दोन दिवसात ग्राम स्तरावरील कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष/सरपंच आणि अशासकीय सदस्य यांना स्वतंत्ररीत्या तालुका निहाय लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी सर्व वयोगटातील सर्व विभागांचे सरकारी/निमसरकारी कायम आणि हंगामी कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कायम व हंगामी कर्मचाऱ्यांना स्वतंत्र आदेश काढून लसीकरणाची व्यवस्था केली होती,त्याप्रमाणे सरपंच व कोरोना नियंत्रण समितीच्या सदस्यांची स्वतंत्ररित्या लसीकरणाची तालुकानिहाय व्यवस्था करण्यात यावी,अशी मागणी भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात येत आहे,असे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page